भारतीय साखरेला मात्र जागतिक बाजारात संधीची चिन्हे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

साखर उत्पादनही 40 लाख टनांनी घटेल. मात्र, जागतिक बाजारात वार्षिक 50 लाख टनांपर्यंत साखरेची तूट निर्माण होणार असल्याने भारतीय साखरेची जगात निर्यात करण्याची संधी मिळेल, असे संकेत आहेत. 

भवानीनगर/सोमेश्वरनगर (जि. पुणे) - एकीकडे महापूर व दुसरीकडे तीव्र दुष्काळामुळे राज्यातील उसाच्या उत्पादनात यंदा 300 लाख टनांनी घट येण्याची चिन्हे आहेत. साखर उत्पादनही 40 लाख टनांनी घटेल. मात्र, जागतिक बाजारात वार्षिक 50 लाख टनांपर्यंत साखरेची तूट निर्माण होणार असल्याने भारतीय साखरेची जगात निर्यात करण्याची संधी मिळेल, असे संकेत आहेत. 

राज्यात सुरवातीच्या अंदाजानुसार 843 लाख टन उसाची उपलब्धता 570 लाख टनांवरून आता 500 लाख टनांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात देशातही आहे. मागील हंगामात देशात 326 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात तब्बल 951 लाख टन उसाचे गाळप झाले. त्यातून 107 लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या वर्षी खरेतर तीच स्थिती होती. मात्र, दुष्काळाने व महापुराने उत्पादनाच्या विक्रमावर पाणी फिरवले. येणाऱ्या हंगामात राज्यातील यापूर्वी हंगाम घेतलेल्या 195 साखर कारखान्यांपैकी किमान 50 कारखाने बंद राहतील, अशी सध्या स्थिती आहे. उरलेल्या कारखान्यांनाही त्यांच्या क्षमतेएवढा ऊस मिळणार नाही, अशी चिन्हे आहेत. या वर्षी साखरेचे उत्पादनही 50 ते 60 लाख टनांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्‍यता साखर उद्योगातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे. 

मंदीमध्ये उभारी घेण्याची संधी 
दुसरीकडे देशात एक ऑक्‍टोबर रोजीचा शिल्लक साखरसाठा विक्रमी 142 लाख टन एवढा नोंदविला आहे. शिवाय, नव्या हंगामातही गरजेपेक्षा जादा म्हणजे 280 लाख टन साखरनिर्मितीचा अंदाज आहे. मात्र, भारतात साखर धंद्यासाठी देशांतर्गत परिस्थिती प्रतिकूल असली, तरी जागतिक बाजारात मात्र नव्या वर्षात साखरेची 50 लाख टनांपर्यंत तूट निर्माण होणार असल्याने भारताला निर्यातीची संधी आहे. जागतिक बाजारातही ऑक्‍टोबरमध्ये साखरेचे दर प्रतिटन 345 डॉलरवर पोचल्याने निर्यातीत होणारा तोटाही भरून निघेल. जगाची साखरेची गरज एक हजार 767 लाख टन आहे. परंतु, नव्या साखर हंगामात जगात एक हजार 719 लाख टन एवढेच उत्पादन होणार आहे. महत्त्वाचा देश असलेल्या ब्राझीलने इथेनॉलकडे लक्ष वळविले असून, तेथेही साखर उत्पादन घटणार आहे. त्याचा विचार करता व सरकारने साखरेला निर्यातीसाठी प्रतिक्विंटल एक हजार 44 रुपये अनुदान जाहीर केले असून, चाळीस लाख टनांचा "बफर स्टॉक'ही केला आहे. त्यामुळे मंदीमध्ये पुन्हा एकदा उभारी घेण्याची संधीही साखर उद्योगापुढे आहे. 

गेल्या हंगामात... (आकडेवारी लाख टनांत) 
326 -  देशातील साखरेचे उत्पादन 
951  - राज्यातील उसाचे गाळप 
107  - राज्यातील साखरेचे उत्पादन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian sugar is an opportunity in the global market

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: