औद्योगिक वीज दरवाढीने उद्योजक हवालदिल 

औद्योगिक वीज दरवाढीने उद्योजक हवालदिल 

बारामती शहर - औद्योगिक वीज दरवाढ व पॉवर फॅक्‍टर दंड आकारणीच्या मुद्द्यावरून आज बारामतीतील उद्योजक आक्रमक झाले. बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून उद्योजकांनी निवेदन दिले. वीजबिलात तीस ते चाळीस टक्के वाढ झाल्याने औद्योगिक क्षेत्र हवालदिल झाल्याचे या वेळी उद्योजकांनी सांगितले. 

या संदर्भात चेंबरचे अध्यक्ष प्रमोद काकडे व कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय पडळकर यांच्याशी आज उद्योजकांनी चर्चा केली. नुकत्याच आलेल्या वीजबिलांमध्ये महावितरणने तीस ते चाळीस टक्के इतकी प्रचंड दरवाढ करत उद्योजकांना दिवाळीची भेट दिल्याचा आरोप उद्योजकांनी केला. 

सुमारे दहा ते बारा टक्‍क्‍यांची वीज दरवाढ होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र वीजबिल चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत वाढवून आले आहे. एकीकडे वीज दरवाढीचा शॉक महावितरणने दिला असून दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने पॉवर फॅक्‍टरची आकारणी करत हजारो रुपयांचा दंड उद्योजकांना लावण्यात आला आहे. यामुळे बारामतीचे औद्योगिक क्षेत्र अडचणीत आले आहे. 

या नवीन वीजदरवाढीमुळे उद्योजकांना इतर राज्यातील उद्योगांशी स्पर्धा करणे अशक्‍य होऊन अनेक उद्योग अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकीकडे बाजारात मंदी असताना आता वीज दरवाढीच्या संकटाने बारामतीतील उद्योजक हवालदिल झाले आहेत. महावितरणने या दरवाढीत सवलत द्यावी व चुकीचा पॉवर फॅक्‍टर दुरुस्त करावा, अशी मागणी उद्योजकांनी केली.  या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश देवकाते यांच्यासह उद्योजक सचिन माने, पांडुरंग कांबळे, शहाजी रणवरे, कैलास शितोळे, भाऊसाहेब तुपे, आशिष पल्लोड, संजय थोरात, अरुण म्हसवडे, महावीर कुंभरकर, महंमद शफीक संकेश्वरकर, बाबासाहेब शेंडे, राजेंद्र साळुंके, नरेश तुपे, के. बी. गायकवाड, सुनील पाटील, कमलेश खेताम आदी उपस्थित होते.

पॉवर फॅक्‍टरबाबत प्रशिक्षणाची मागणी
नवीन पॉवर फॅक्‍टरचे सूत्र अमलात आणण्यापूर्वी उद्योजकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सध्याच्या यंत्रणेत दुरुस्तीसाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी देणे गरजेचे आहे, अशी मागणी चेंबरच्या वतीने महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय पडळकर यांच्याकडे करण्यात आली. पडळकर यांनी उद्योजकांच्या योग्य मागण्यांचा सहानुभूतीने विचार करण्याचे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com