महागाईत कर्मचाऱ्यांना दिलासा; १० देशांमधील सर्वाधिक पगारवाढ भारतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation Employees India has highest salary hike among 10 countries

महागाईत कर्मचाऱ्यांना दिलासा; १० देशांमधील सर्वाधिक पगारवाढ भारतात

मुंबई : सध्या सगळे जग वाढत्या महागाईचा, मंदीच्या संकटाचा सामना करत आहे. सर्वत्र कर्मचारी कपात, पगार कपात अशी परिस्थिती असताना भारताची स्थिती मात्र उत्तम आहे. यामुळे २०२३मध्ये देशातील कर्मचाऱ्यांनी घसघशीत पगारवाढ मिळण्याचा अंदाज आहे. पगार वाढीच्याबाबतीत भारत पहिल्या आठ देशांमध्ये प्रथम स्थानावर आहे. भारतात सर्वाधिक ४.६ टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. तर चीन, व्हिएतनाम, सौदी अरेबिया आशियाई देशांच्या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये आघाडीवर आहेत, असे ईसीएच्या वेतन कल सर्वेक्षण अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

हे सर्वेक्षण ६८ देशांतील ३६० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित आहे. या अहवालानुसार, या यादीत भारताचे शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका सर्वांत खालच्या क्रमांकावर आहेत. आघाडीच्या दहा देशांच्या यादीत भारतानंतर व्हिएतनाम (४.०), चीन (३.८), ब्राझील (३.४), सौदी अरेबिया (२.३), मलेशिया (२.२), कंबोडिया (२.२), थायलंड (२.२), ओमान (२.०), रशिया (१.९) यांचा क्रमांक लागतो. तर पगार कपात करणाऱ्या देशांच्या यादीत सर्वाधिक पगार कपात अर्जेंटिनामध्ये २६.१ टक्के होण्याचा अंदाज असून, त्यानंतर घाणा ११.९ टक्के, तुर्किए १४.४ टक्के , श्रीलंका २०.५ टक्के आणि पाकीस्तान ९.९ टक्के यांचा क्रमांक लागतो. युरोपात मंदीचे सावट अधिक गंभीर असल्याने हा सर्वांत जास्त प्रभावित प्रदेश आहे. येथे कर्मचाऱ्यांना पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे.

पगारवाढ होणाऱ्या पहिले दहा देश

देश पगार वाढ - (%)

 • भारत ४.६

 • व्हिएतनाम ४.०

 • चीन ३.८

 • ब्राझील ३.४

 • सौदी अरेबिया २.३

 • मलेशिया २.२

 • कंबोडिया २.२

 • थायलंड २.२

 • ओमान २.०

 • रशिया १.९

पगार कपात अपेक्षित असलेले पाच देश

देश पगारकपात (%)

 • पाकिस्तान ९.९

 • घाना ११.९

 • तुर्की १४.४

 • श्रीलंका २०.५

 • अर्जेंटिना २६.१