पायाभूत सुविधांसाठी जपानचे सहकार्य आवश्‍यक - फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 मार्च 2017

मुंबई - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मेट्रो कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर सी लिंक यांसारखे प्रकल्प सुरू आहेत; तसेच नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग प्रकल्पही सुरू होत आहे. या पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील वित्तीय संस्थांसह सुमिटोमो मित्सुई बॅंकेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 21) येथे केले.

मुंबई - महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मेट्रो कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर सी लिंक यांसारखे प्रकल्प सुरू आहेत; तसेच नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग प्रकल्पही सुरू होत आहे. या पायाभूत प्रकल्पांमध्ये जपानमधील वित्तीय संस्थांसह सुमिटोमो मित्सुई बॅंकेने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 21) येथे केले.

जपानमधील सुमिटोमो मित्सुई बॅंकिंग कार्पोरेशनच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील मुंबई शाखेचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामित्सु, एसएमबीसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सोसुकी मोरी, महाव्यवस्थापक आणि भारतातील प्रमुख हिरायोकी काकितो, मुंबई शाखेचे महाव्यवस्थापक को इरिझाव्ह, कोटक महिंद्रा बॅंकेचे उपाध्यक्ष उदय कोटक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्वातून पालघरमधील एका गावात स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार आणि एसएमबीसी बॅंक यांच्यात या वेळी सामंजस्य करार झाला. त्यानुसार बॅंक पाणीपुरवठ्यासाठी सुमारे 80 लाख रुपये देणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील परकीय गुंतवणुकीपैकी सर्वांत जास्त म्हणजे 50 टक्के गुंतवणूक राज्यात झाली आहे. त्यामुळे राज्यात गुंतवणूक करण्यास मोठी संधी आहे. त्याचबरोबर मुंबई जगातील आर्थिक केंद्रांपैकी पाचव्या स्थानावर आहे. राज्य वांद्रे-कुर्ला संकुल येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई ही देशाचे पॉवर हब होईल.

जपानचे भारतातील राजदूत हिरामित्सु म्हणाले की, जपान आणि भारत यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील. अनेक जपानी कंपन्या भारतात गुंतवणूक करू इच्छित आहेत. विशेषतः महाराष्ट्रात विविध कंपन्या आणि वित्तीय संस्थांची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांचे कौतुक करून महिंद्रा बॅंकेचे कोटक म्हणाले की, मुंबई हे देशाचे आर्थिक इंजिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी उचललेल्या योग्य पावलामुळे सध्या देश आणि राज्य विकासाच्या वाटेवर आहे. येथे गुंतवणूक करण्याची हीच योग्य संधी आहे.

बॅंकेचे भारतातील प्रमुख हिरायोकी काकितो म्हणाले की, बॅंकेने व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे ठरविले आहे. यानुसार आज बॅंक आणि पालघर जिल्हा परिषद यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infrastructure necessary for Japan to cooperate