प्रेरणादायी! बारावीला 55 टक्के; त्यानंतर जिद्दीने बनले 'आयएएस' अधिकारी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 29 जुलै 2019

त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण बाराबंकी येथे झाले. नंतर वडिलांच्या बदलीमुळे ते सावस्थी येथे शिक्षणासाठी गेले. उदयराज मिश्रा या शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि शिक्षणाबाबत ते गंभीर झाले.

बीड : आजोबा देवीप्रसाद पांडेय सैन्यदलात, तर वडील ऱ्हीदयराम पांडेय सैन्यदलातून पोलिस दलात त्यामुळे पोलिस आणि सैन्याच्या वर्दीबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण  डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना होते. त्यांचेही लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते.

दहावीपर्यंत सतत टॉपर असलेल्या पांडेय यांना बारावीमध्ये मात्र केवळ 55 टक्के  गुण पडले. यामुळे कुटुंबीयांचा भ्रमनिरास झाला आणि नातेवाईकांकडून अवहेलना झाली. मात्र, याच अपयशाने डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना असिस्टंट कमांडंट ऑफ पोलिस, सहाय्यक प्राध्यापक आणि कलेक्टर केले. 

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांचे वडील पोलिस दलात निरीक्षक पदावर, आई गृहिणी, दोन बहिणी शिक्षिका, एक दाजी सरपंच, तर एक एसपीजीमध्ये (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) आहेत. एमबीए केलेले भाऊ भारतीय प्रशासन सेवा परीक्षेची तयारी करत आहेत. भावंडांत अस्तिक कुमार पांडेय थोरले आहेत. भारतीय पोलिस सेवेत असलेल्या आणि औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील त्यांच्या पत्नी आहेत. 

त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षण बाराबंकी येथे झाले. नंतर वडिलांच्या बदलीमुळे ते सावस्थी येथे शिक्षणासाठी गेले. उदयराज मिश्रा या शिक्षकामुळे त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला आणि शिक्षणाबाबत ते गंभीर झाले. सहावीला वर्गात, सातवीला शाळेत, आठवीला ते जिल्ह्यातून प्रथम आले. नववीला त्यांना जिल्ह्यात चौथा, तर 10 वीला 12 वा रँक मिळाला. त्यांच्या यशामुळे त्यांचे खूपच कौतुक होत होते. मुलगा असे यश मिळवित असल्याने वडिल ऱ्हीदयराम पांडेय यांचेही अभिनंदन होत होते. त्यांनी अभियंता व्हावे असे वडिलांना वाटत होते. त्यासाठी त्यांना 11 वीत फैजाबाद येथे विज्ञान शाखेला प्रवेश देऊन वसतीगृहात ठेवले. पण, 12 वीत त्यांना केवळ 55 टक्के गुण मिळाले. त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला. नातेवाईकांसह वडिलही नाराज झाले. 

अभियांत्रिकी प्रवेशाचे स्वप्न धुळीला मिळाल्यानंतर इतरांचा भ्रमनिरास झाला खरा, पण याच निकालावर अस्तिक कुमार पांडेय यांनी चिंतन केले. स्वत:तील क्षमता आणि बुद्धीमत्तेला परिश्रमाची जोड आणि एकाग्रता आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आयएएस (भारतीय प्रशासन सेवा) व्हायचेच, ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी तसे नियोजनही केले. 

आयएएससाठी अभ्यासक्रम कोणता, पुस्तके कोणती, अभ्यास कसा करायचा याची माहिती घेऊन आयएएस परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी पदवीला सुरक्षा, तर पदव्युत्तर पदवीसाठी इतिहास विषय निवडला. पदवीला विद्यापीठातून सातवा तर पदव्युत्तर पदवीला विद्यापीठातून त्यांना चौथा रँक मिळाला. 

‘तत्कालिन भारतात तंत्रज्ञानाची प्रगती आणि त्याचे परिणाम’ या विषयावर पीएच. डी. ही मिळविली आणि सेट-नेट परीक्षा उत्तीर्ण होऊन ते सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र झाले. विषयासह पदवी उत्तीर्ण केली. आयएएससाठी त्यांना हिंदी आणि इतिहास विषय निवडायचे होते, हे त्यांनी अगोदरच ठरवून तेच विषय पदवीत घेतले. त्यामुळे 2008 ला परीक्षेला बसण्यापूर्वी 2007 मध्ये त्यांचा अभ्यास पूर्ण झाला होता. 

प्रोफेसर टु कलेक्टर
आयएएसमध्ये अपयश आले, तर हाती पर्याय असावा म्हणून अगोदरच त्यांनी सेट, नेट व पीएच. डी. पदव्या मिळविल्या होत्या. यामुळे त्यांना झारखंड व दिल्ली विद्यापीठात इतिहासाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही नोकरी मिळाली. या काळात आयएएसच्या तयारीसाठी त्यांनी 2008 मध्ये दिल्लीला हिंदी साहित्य विषयाची शिकवणी लावली. मे 2008 मध्ये झालेल्या युपीएससी पूर्व परीक्षेत त्यांना अपयश आले. 

पुढच्या मेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांची मुलाखतही झाली. पण, त्यांचा निकाल प्रतिक्षेत राहिला. पण, 2008 मध्येच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीपीएफ (केंद्रीय पोलिस फोर्स) परीक्षेत यश मिळवत ते असिस्टंट कमांडंट ऑफ पोलिस झाले. त्यांनी श्रीनगर (उत्तराखंड) येथे वर्षभराचे प्रशिक्षणही पूर्ण केले. मात्र, 2010 मध्ये झालेल्या युपीएससीच्या नागरी सेवा (आयएएस) परीक्षेचा मे 2011 मध्ये निकाल लागला आणि त्यांची निवड झाली. 

पदवी व पदव्युत्तर व सेट-नेट शिक्षण काळात अस्तिक कुमार पांडेय यांनी सहा वर्षे हातानेच जेवण बनविले. दुपारी दाळ - भात आणि संध्याकाळी पोळी भाजी हा मेन्यू ठरलेला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inspirational story Getting 55 percent in XII exam Then stubbornly became an IAS officer