लसीकरणावेळी आता विमाकवच

तात्या लांडगे
बुधवार, 24 जुलै 2019

लसीकरणावेळी अथवा लसीकरणानंतर काही तासांत बालक अथवा मुलांचा अनपेक्षितपणे मृत्यू होण्याच्या घटना होत आहेत. त्याला आरोग्य विभागाला जबाबदार धरले जात असल्याने आता लसीकरणावेळी अथवा लसीकरणानंतर 12 तासांत संबंधित बालकाचा मृत्यू झाल्यास पाच लाखांचे विमाकवच मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाच लाखांची मिळणार मदत; दरवर्षी 34 लाख मुलांना टोचली जाते लस
सोलापूर - लसीकरणावेळी अथवा लसीकरणानंतर काही तासांत बालक अथवा मुलांचा अनपेक्षितपणे मृत्यू होण्याच्या घटना होत आहेत. त्याला आरोग्य विभागाला जबाबदार धरले जात असल्याने आता लसीकरणावेळी अथवा लसीकरणानंतर 12 तासांत संबंधित बालकाचा मृत्यू झाल्यास पाच लाखांचे विमाकवच मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने एक वर्षाच्या आतील साधारण 34 लाख बालकांना राज्यभरातील एक लाख 86 हजार कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण केले जाते. बालकांना पोलिओ, रोटावायरस, पेन्टावेलेन्ट, हेप-बी, विटामिन-ए, पीसीवी, एफआयपीव्ही अशा लस दिल्या जातात. केंद्र सरकारच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी गोवर-रुबेलाची मोहीम देशभर राबविण्यात आली. दरम्यान, लस टोचल्यानंतर काही मुलांचा मृत्यूही झाला. लस टोचण्यापूर्वी संबंधित मुलगा हसत-खेळत असतानाही लसीकरणानंतर मात्र त्याचा मृत्यू झाला. त्याला मृत मुलांच्या पालक व नातेवाइकांनी डॉक्‍टर व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले. या सर्व घटनांवर मात करून लसीकरण मोहीम यशस्वी होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला जाणार आहे.

राज्याची स्थिती
लसीचे प्रकार - 8
लसीकरण होणारे बालक - 34.27 लाख
लसीकरणासाठी कर्मचारी - 1.86 लाख
लसीकरणावरील खर्च - 7,560 कोटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insurer now when vaccinated State Government