अंतर्गत गुणांचा वाद आता मिटणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

अकरावीच्या प्रवेशाबाबत राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांवरून निर्माण झालेला वाद आता शमण्याची चिन्हे आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशक्षमता वाढवून या वादावर तोडगा काढला जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुणे - अकरावीच्या प्रवेशाबाबत राज्य शिक्षण मंडळ आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांवरून निर्माण झालेला वाद आता शमण्याची चिन्हे आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशक्षमता वाढवून या वादावर तोडगा काढला जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल यंदा बारा टक्‍क्‍यांनी घटला आहे. या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणही या वर्षी देण्यात आलेले नाहीत. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना दहावीत अंतर्गत गुण देण्यात आले आहेत. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण मिळाले नसल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत त्यांना प्रवेशासाठी प्रतिष्ठित, चांगली महाविद्यालये मिळणार नाहीत, या सर्व जागा सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळतील, अशी पालकांची चिंता आहे.

याबाबत तिढा निर्माण झाल्याने हा वाद शालेय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांपर्यंत गेला. त्यानंतर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण रद्द करण्याचे सूतोवाच करण्यात आले; परंतु त्याला विद्यार्थ्यांच्या पालकांनी विरोध केला. त्यामुळे हा पेच कसा सोडवायचा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  त्यावर मंत्रालयस्तरावर चर्चा सुरू आहे. यावर मंगळवारी (ता. १८) तोडगा निघणार असल्याचे शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्य मंडळाच्या अकरावीसाठी प्रवेश घेणाऱ्या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ आठ हजार असते. राज्य मंडळाचे सुमारे ७० हजारांहून अधिक विद्यार्थी असतात. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागा वाढवून देण्यावर एकमत झाल्याचे सांगण्यात येते. याबाबत मंगळवारी मंत्रालयातून निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयास पाच ते दहा टक्के जागा वाढवून दिल्या जातील.

प्रवेश प्रक्रिया लांबणार
दहावीचा ऑनलाइन निकाल लागल्यानंतर अकरावीच्या अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली जाते; परंतु गुणांचा वाद सुरू झाल्याने ही प्रवेश प्रक्रिया लांबणार आहे. अजूनही अर्जाचा भाग दोन म्हणजे पसंतीक्रम देण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ती बुधवारपासून (ता. १९) सुरू होण्याची चिन्हे आहेत. अकरावीसाठी आतापर्यंत ७५ हजार ६९१ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internal Marks Dispute Solve Education