International Tiger Day : महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ 

International Tiger Day  : महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 65 टक्क्यांनी वाढ 

मुंबई - राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. ही वाढ अंदाजे  ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

देशातील वाघांची संख्या २९६७

भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यावतीने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्यात येते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ मध्ये झाली. तेंव्हा देशात १४११ वाघ होते, २०१० मध्ये दुसरी गणना झाली तेंव्हा  १७०६, २०१४ मध्ये तिसरी गणना झाली तेंव्हा देशात २२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात २९६७ वाघ झाले आहेत.

महाराष्ट्रातील व्याघ्रसंवर्धनाला भरीव यश

महाराष्ट्रात २००६ साली १०३ वाघ होते. ते २०१० मध्ये वाढून १६८ झाले. २०१४ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या आणखी वाढून १९० झाली. तर मागील चार वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२ इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.

राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प

राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमधील स्थानिकांचे वनावरचे अवलंबित्व कमी व्हावे, मानव वन्यजीव संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना" राबविली जात आहे. योजनेमध्ये समाविष्ट गावांमध्ये जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढवतांना मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येतात. यामध्ये स्थानिकांना  पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.

व्याघ्रसंवर्धनात  पहिली पाच राज्ये

देशात मध्यप्रदेश राज्यात वाघांची संख्या ३०८ वरुन ५२६ इतकी झाली आहे. हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ४०६ वरुन ५२४ इतकी झाली आहे. हे राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला असून येथील वाघांची संख्या ३४० वरुन ४४२ इतकी झाली आहे.  महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या १९० वरुन ३१२ इतकी झाली आहे.  पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या २२९ वरुन २६४ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com