Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

महाराष्ट्राच्या सामर्थ्याविषयी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहा!

भारतासारख्या विशाल देशाचा महाराष्ट्र मुकुटमणी आहे. राज्याच्या विकासात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले आहे. भाजपचे ते महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री.आज महाराष्ट्राकडे अन्य राज्ये आदराने बघतात. जगातल्या पुढारलेल्या देशांनाही मागे टाकणारा जीडीपी दर अन् विकास महाराष्ट्राला साधायचा आहे. महाराष्ट्राविषयी आपल्या भावना त्यांनी सकाळच्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या...

प्रश्‍न - हीरक महोत्सवी वाटचालीत महाराष्ट्राने काय कमावले आहे?
उत्तर - देशातल्या सर्व राज्यांमध्ये खऱ्या अर्थाने महान ठरणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र हा आपला लौकीक. बाहेर वावरताना तर तो अधिक प्रकर्षाने जाणवतो. योग्य आणि अचूक व प्रवाही निर्णय, कालसुसंगत धोरणे अन् या समीकरणांना वेग देणारे गतीमान प्रशासन ही महाराष्ट्राची 60 वर्षातील कमाई आहे. सकल उत्पन्न वाढते ठेवणे, सामाजिक क्षेत्रात पथदर्शी निर्णय घेणे हे सामूहिक यश, तर सर्वाधिक भारतरत्ने जन्माला घालणारे राज्य ही त्या-त्या व्यक्तींच्या प्रयत्नांनी मिळालेले ललामभूत कोंदण. आज साठ वर्षांचा टप्पा गाठताना महाराष्ट्राचे हे अभिमानगीत आनंद देतेय. 

पुढच्या दहा-वीस वर्षात महाराष्ट्र कुठे असायला हवा?
    भारतातल्या या राज्याशी बरोबरी करायची ईर्षा अन्य राज्यांमध्येच नव्हे, तर बाहेरच्या देशांमध्येही निर्माण व्हायला हवी.

जरा नीट सांगा ना काय म्हणायचे आहे ते?
    आजच्या परिस्थितीतच सांगतो. सध्या कोरोनाचा कहर माजलाय. चीनमधील गुंतवणूक तेथेच मर्यादित न ठेवता ती बाहेरही विस्तारीत ठेवावी, असा बड्या कंपन्यांचा प्रयास आहे. जपानने तसे जाहीरही केलंय. संकट नेहमीच संधी घेवून येत असते. ही नवे पडाव शोधणारी गुंतवणूक महाराष्ट्राचे सर्वात मोठे शक्‍तीस्थळ ठरू शकते. ही गुंतवणूक आज युरोपात जावू शकत नाही. तेथील समस्या जगजाहीर आहेत. आफ्रिका अजून या संधी घेण्याच्या तयारीत नाही. त्यामुळेच ही गुंतवणूक आशियात येणार हे सरळ आहे. व्हिएतनामसारखे देश त्याचा लाभ घेण्यासाठी झटत आहेत. महाराष्ट्राने या संदर्भात पुढाकार घेतला, ईज ऑफ डुईंग बिझिनेसचे वातावरण निर्माण केले तर स्वप्नभूमीच्या शोधातल्या कंपन्यांना महाराष्ट्र तीर्थक्षेत्र वाटू शकेल. 

प्रगतीच्या वाटेवरची आव्हाने कोणती?
    आव्हानेही बरीच आहेत. जगाच्या रचना वारंवार बदलत असतात, त्यामुळे संपन्न प्रदेशांसमोरही आव्हाने असतातच. महाराष्ट्रात विकास सर्वदूर पसरलेला नाही. तो काही टापूतच मर्यादित आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये विकास पोहोचवण्याचे आव्हान आहे. त्यावर सर्व पक्षांनी एकत्रित तोडगा काढावा. दुसरे मोठे अन् सर्वाधिक चिंतेचे आव्हान म्हणजे शाश्‍वत शेतीचे. सिंचन मर्यादित. त्यातच वातावरणात सध्या होत असलेले अनाकलनीय बदल.

पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेणारी क्‍लायमेट रिझीलियन्ट शेतीव्यवस्था निर्माण करणे आव्हान आहे. शेतीत कालसुसंगत बदल युद्धपातळीवर करावेत. पाण्याचे नियोजन हेही मोठे आव्हान. तुटीच्या खोऱ्यांचे जलनियोजन करण्यासाठी जास्त पाणी असलेल्या प्रदेशातून पाणी अभाव्याच्या प्रदेशात वळवावे लागेल. आपण राज्य म्हणून हे करू शकलो तर प्रगतीची फळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरतील. संघराज्यीय ढाच्यात राज्याराज्यांत स्पर्धा असतेच, ती निकोप असली की झाले. आयटीचा विचार केला तर ही स्पर्धा तेलंगणा, कर्नाटक, आंध्रशी आहे. उद्योगांबाबत बोलायचे तर गुजरात, तमिळनाडूशी, आरोग्य व्यवस्थापन अन् डिझास्टर मॅनेजमेंटबाबत बोलायचे तर केरळ, ओडिशाशी  स्पर्धा आहे. महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात आघाडी मिळवावी. 

महाराष्ट्राच्या आजवरच्या वाटचालीतले सर्वात महत्वाचे क्षण कोणते?
    अनेक आहेत. पण, सिंहावलोकन करताना आठवायच्या त्या चांगल्या बाबी. पायाभूत सुविधांसाठी आज सुरू असलेले श्रम आपली संपत्ती आहे. राज्यनिर्मितीचा क्षण महत्वाचा. माझा त्यावेळी जन्मही झाला नव्हता. पण रोजगार हमी योजनेसारखा महत्वाचा कायदा महाराष्ट्रातून निर्माण झाला, तो दिवस सुवर्णाक्षरांचा. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला तोही असाच संस्मरणीय. सेवा हमी कायद्याची मुहुर्तमेढ करणारा दिवसही सुवर्णक्षरांनी कोरावा असाच. कोयनेतील लेकटॅपिंगचा क्षणही मोलाचाच. आज राज्याच्या साठीचा हिरेजडित पाढा वाचताना मला स्मृतीकोशात साठवलेला एक क्षण तर आवर्जून आठवतोच आठवतो : दुष्काळी भागात लोकसहभागातून खणलेल्या कित्येक किलोमीटरच्या खड्ड्यात पावसाने हजेरी लावताच गंगा अवतीर्ण झाली तो. पाणी हेच जीवन आहे अन् महाराष्ट्रात पाणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com