'अवनी' शिकार प्रकरणी घटनाक्रमाचा तपास करणार : मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

यवतमाळ जिल्ह्यात 'अवनी' या वाघिणीला वन विभागाने ठार मारल्याच्या प्रकरणी या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल. यात काही दोष आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. तसेच वाघिणीच्या मृत्यूमुळे मला दुःख झाल्याचे त्यांनी 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुंबई- यवतमाळ जिल्ह्यात 'अवनी' या वाघिणीला वन विभागाने ठार मारल्याच्या प्रकरणी या संपूर्ण घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल. यात काही दोष आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. तसेच वाघिणीच्या मृत्यूमुळे मला दुःख झाल्याचे त्यांनी 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्य सरकारच्या आदेशानंतर यवतमाळमध्ये 'अवनी' वाघिणीला शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यामुळे देशभरात नाराजी व्यक्त होत असतानाच या प्रकरणाची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मेनका गांधी या मुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर संतापल्या आहेत. कायदेशीर आणि राजकीय पातळीवर या प्रकरणाची दखल घेण्यात येईल, असा इशारा देतानाच 'अवनी'च्या 'एन्काउंटर'ची 'सुपारी' एका गॅंगस्टरला देण्यात आली होती, असा गंभीर आरोप मेनका गांधी यांनी केला आहे. 'अवनी'ची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणिप्रेमींनी निषेध व्यक्त केलेला असतानाच मेनका गांधी यांनीही ट्विट करून या हत्येबद्दल दुःख व्यक्त केले आहे आणि फडणवीस सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

मेनका म्हणाल्या, की शफाअत अली यांनी आतापर्यंत तीन वाघ, दहा बिबटे, काही हत्ती आणि 300 रानडुकरे मारली आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहीत असतानाही फडणवीस सरकारने 'अवनी'च्या एन्काउंटरची सुपारी त्यांनाच का दिली? देशविरोधी लोकांना ते अवैधपणे शस्त्र पुरवतात हेसुद्धा सर्वांना ठाऊक आहे. तरीही अमानवी आणि अवैध कृत्ये करण्यासाठी अशा लोकांना का बोलावले जाते, असा प्रश्‍न मेनका गांधी यांनी केला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, वाघिणीला ठार मारण्याच्या घटनाक्रमाचा तपास करण्यात येईल. मेनका गांधी मंत्री असल्या तरी त्या प्राणीप्रेमी आहेत. त्या सातत्याने असे विषय अत्यंत संवेदनशीलतेने मांडत असतात. त्यामुळे या घटनेवरून ज्या शंका उपस्थित झाल्या आहेत, त्याचा योग्य तपास करून कारवाई करण्यात येईल.

Web Title: Investigate on Avni hunting case says Chief Minister