आयोडिनयुक्‍त मीठ खा अन्‌ निरोगी राहा!

Iodine deficiency Day
Iodine deficiency Day

सोलापूर - खाण्याच्या पदार्थांमध्ये, पाण्यात अथवा जमिनीत आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास मेंदू आणि शरीराची वाढ खुंटते, तर गलगंडही होत असल्याचे चित्र आहे. राज्यात प्रामुख्याने धुळे, नंदुरबार येथे असे रुग्ण सर्वाधिक असून, सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या दोन टक्‍के नागरिकांना गलगंड असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली.

नागरिकांनी नेहमीच्या खाण्यात पौष्टिक भाजीपाला, फळे आणि आयोडिनयुक्‍त मिठाचा वापर केल्यास गलगंड अथवा त्यानंतर होणाऱ्या कर्करोगापासून मुक्‍तता मिळू शकते. पहाडी व आदिवासी भागातील नागरिकांना आयोडिनयुक्‍त मीठ मिळत नाही. त्या ठिकाणच्या जमिनीमध्ये अथवा पाण्यात आयोडिनचे प्रमाणही कमी असल्याने गलगंड अथवा कर्करुग्णांचे प्रमाण जैसे थे असल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांना सकस आहार पुरवला जातो. गलगंड अथवा त्यानंतरचा कर्करोग होऊ नये, यासाठी संबंधितांनी वेळेवर वैद्यकीय तपासण्या करून घ्याव्यात. जेणेकरून वेळेत निदान करणे शक्‍य होईल, असे आवाहनही डॉ. ठाकूर यांनी या वेळी केले. 

संपूर्ण जगभरात सुमारे दीडशे कोटी रुग्ण असे आहेत की, ज्यांच्यात आयोडिनची कमतरता आहे. तर भारतात त्याचे प्रमाण दोन कोटी असून ७१ लाख रुग्ण गलगंडाने त्रस्त आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारतर्फे विशेष मोहीम राबविली जाते, मात्र प्रमाण कमी झालेले नाही, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

मेंदू व शरीराच्या वाढीसाठी आयोडिन गरजेचे असून, आयोडिनच्या कमतरतेमुळे स्त्रीच्या मासिक पाळीत बदल होतो. लवकर बाळंतपण येण्याची समस्या वाढत आहे. लहान बालकांमध्ये मतिमंदपणा, बौद्धिक वाढ खुंटणे आदी दिसून येते. त्यामुळे सर्वांनी आयोडिनयुक्‍त मीठ वापरावे. जेणेकरून अशा आजारांपासून प्रत्येकजण मुक्‍त होऊ शकतो.
- डॉ. अर्चना खारे

गलगंडवरील  ठोस उपाय...
दररोज आहारात आयोडिनयुक्‍त मिठाचा करावा वापर 
रासायनिक खताच्या नव्हे, तर सेंद्रिय शेतीतील पालेभाज्यांचा वापर करावा
वयोमानानुसार वाढ होत नसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा वेळेत सल्ला घ्यावा
सकस अन्‌ पौष्टिक आहार घ्यावा : जमीन, पाण्याची करून घ्यावी तपासणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com