आयटी क्षेत्रात नोकरी जाण्याच्या भीतीचा ताण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

पुणे : आलिशान इमारतींमध्ये माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी, उंचावलेले जीवनमान, सामाजिक प्रतिष्ठा असली तरी सामाजिक व आर्थिक असुरक्षितता आणि नोकरी जाण्याच्या भीतीपोटी बहुतांश तरुणाई मानसिक समस्यांना सामोरी जात आहे. परिणामी, तणाव घालविण्यासाठी 'आयटीयन्स' दारू, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन अशा व्यसनाधीनतेकडे वळत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यावर मात करण्यासाठी आयटी कंपन्यांसह स्वयंसेवी संस्थांकडून ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. 

या संदर्भात नामांकित आयटी कंपनीत काम करीत असलेली अभियंता रश्‍मी वाघेला 'सकाळ'शी बोलताना म्हणाली, ''पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर 'कॅम्पस इंटरव्यू' किंवा 'ऑनलाइन साइट्‌स'द्वारे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी लागते. घरापासून कंपनीपर्यंत गाडीची व्यवस्था असते. कामाच्या ठिकाणी समवयस्क तरुणांची 'टीम' असते. विविध 'प्रोजेक्‍ट'वर काम करतो. विशेषतः मुलींना काम संपेपर्यंत प्रचंड मानसिक तणावाखाली काम करावे लागते. छोटीसी चूकदेखील महागात पडू शकते. स्पर्धा वाढल्यामुळे मानसिक दडपणाखाली काम करावे लागते. तो तणाव घालविण्यासाठी विकेंड पार्टी, प्रवास, सिनेमा असा दिनक्रम सुटीच्या दिवशी असतो.'' 

आयटी कर्मचारी अतुल खैरनार म्हणाला, ''नोकरी जाण्याच्या भीतीपोटी नेमून दिलेले काम वेळेच्या आत पूर्ण करावे लागते. ते पूर्ण होईपर्यंत घरी जाता येत नाही. मानसिक दडपणाखाली किमान नऊ ते दहा तास काम करावे लागते. स्वभाव चिडचिडा होणे, झोप व्यवस्थित न होणे असा त्रास सुरू होतो. तो घालविण्यासाठी मग दारू, धूम्रपान, हुक्का किंवा तत्सम अमली पदार्थांचे सेवन करून तणाव घालविण्याचा प्रयत्न केला जातो. मी स्वतः पर्यटन, सिनेमा आणि विविध खेळ खेळून तणाव घालविण्याचा प्रयत्न करतो; परंतु संबंधित कंपन्यांनी तणाव व्यवस्थापन कार्यशाळा व समुपदेशन केले पाहिजे.'' 

कामानंतर शारीरिक दुखणी ही केवळ जास्त कामे केल्यामुळे येतात असे नाही; तर मानसिक आजारांची ती पूर्वलक्षणे असतात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मानसिक आजार बळावू लागतात. कोणत्याही विशिष्ट गोष्टींची भीती वाटणे, नैराश्‍य येणे, अनुत्साह ही मानसिक आजारांची लक्षणे आहेत. त्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, वैद्यकीय उपचार केल्यास त्यावर मात करता येते. व्यवसनाधीनतेकडे वळण्यापेक्षा समतोल आहार, व्यायाम, ध्यानधारणा, आवड-छंद जोपासणे यातूनदेखील तणावमुक्त जीवन जगता येते. त्यासाठी समुपदेशन, कार्यशाळांची आवश्‍यकता आहे. 
- डॉ. नितीन दलाया, संस्थापक, नित्यानंद पुनर्वसन केंद्र. 

---------------------------------------------------------------------------------------- 
 
Web Title: IT employees facing stress issues over job security