उजनीतून कर्नाटकसाठी पाणी सोडणे अशक्यच! लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचा अहवाल; धरण मायनस २५ टक्के

उजनीतून तीन टीएमसी पाणी देण्यासाठी भीमा नदीतून एकूण १० टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. कर्नाटकसाठी पाणी सोडल्यास उजनी बॅक वॉटरवरील बारामती, नगर, धाराशिव, इंदापूर, सोलापूर या शहरांच्या व एमआयडीसींच्या योजना बंद पडतील.
डिंभे धरण
डिंभे धरणsakal

सोलापूर : उजनीतून तीन टीएमसी पाणी देण्यासाठी भीमा नदीतून एकूण १० टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. कर्नाटकसाठी पाणी सोडल्यास उजनी बॅक वॉटरवरील बारामती, नगर, धाराशिव, इंदापूर, सोलापूर या शहरांच्या व एमआयडीसींच्या योजना बंद पडतील. त्यातच पुन्हा पाऊस लांबल्यास सोलापूर शहरासाठी व जनावरांसाठी नदीतून एक आवर्तन सोडावे लागेल. अशा परिस्थितीत कर्नाटकसाठी पाणी सोडणे अशक्य असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.

कर्नाटकातील बेळगाव, विजयपुरा, बागलकोट, कलबुर्गी, यादगीर, रायचूर या जिल्ह्यांमध्ये मोठे पाणी संकट उद्‌भवले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘वारणा-कोयना’तून दोन तर व उजनी धरणातून तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे.

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने वारणा-कोयना पाणीसाठ्यातून कर्नाटकसाठी एक टीएमसी पाणी सोडले होते. तोच धागा पकडून आता पुन्हा कर्नाटकने पाच टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. परंतु, सद्य:स्थितीत ‘नाकापेक्षा मोतीच जड’ अशी अवस्था आहे. ‘उजनी’ मायनस २५ टक्क्यांवर असून कर्नाटकला पाणी पोचण्यासाठी धरणातून १० टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. तर वारणा ते कर्नाटक १०० किलोमीटर अंतर असल्याने त्यासाठी दीड-दोन टीएमसी जास्त पाणी सोडावे लागेल. पण, सध्या तशी परिस्थिती नसल्याने कर्नाटकला पाणी देता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी शासनाला कळवले आहे.

शासनाला दिलेल्या अहवालातील ठळक बाबी...

  • - सद्य:स्थितीत उजनी धरण मायनस २५ टक्क्यांवर गेले असून आता कॅनॉल, बोगद्यातून पाणी सोडणे अशक्य

  • - मायनस ७० टक्क्यांपर्यंत नदीतून पाणी सोडता येते, तेही केवळ पिण्यासाठीच

  • - धरणात सध्या ५०.६१ टीएमसी मृत पाणीसाठा असून त्यात १४ टीएमसीपर्यंत गाळ आहे

  • - भीमा नदीद्वारे उजनी ते औज हे अंदाजे १४३ किलोमीटर अंतर पार करायला लागते सहा टीएमसी पाणी

  • - पाऊस लांबल्यास पुन्हा एकदा सोलापूर शहर व ग्रामीण भागासाठी नदीतून सोडावे लागेल एक आवर्तन

  • - कर्नाटकला तीन टीएमसी पाणी देण्यासाठी किमान नऊ-दहा टीएमसी पाणी लागेल, त्यामुळे सोलापूरसह बॅक वॉटरवरील पाणीपुरवठा योजना बंद पडतील

कोयनातून नव्हे, वारणातून एक टीएमसी शक्य

उन्हाची तीव्रता व स्थानिक गरज आणि पावसाच्या अनिश्चितता, याचा विचार करूनच कर्नाटकसाठी पाणी सोडण्याचा निर्णय होणार आहे. उजनीतून पाणी सोडणे अशक्य असल्याचा अहवाल सोलापूर अधीक्षक अभियंत्यांनी शासनाला पाठवला आहे. तर कोयना धरणाने तळ गाठला असून त्यातूनही पाणी सोडणे शक्य नाही. पण, वारणा धरणात सध्या पाच टीएमसी पाणी असून स्थानिक गरज, उन्हाची तीव्रता आणि मान्सूनचा अंदाज घेऊन एक टीएमसीपर्यंत पाणी देण्यासारखी स्थिती असल्याचे तेथील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पण, त्यासंदर्भात शासनाने त्यांना कोणताही अहवाल मागितलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com