राज्यात "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना' - ऊर्जामंत्री बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

जळगाव/भुसावळ - राज्यातील शेतकऱ्यांना अखंडितपणे दहा ते बारा तास वीज मिळण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होणार आहे. शेतकऱ्यांकडे 2400 कोटींची विजेची थकबाकी आहे. ती शेतकऱ्यांनी त्वरित भरल्यास शेतकऱ्यांच्या बिलावरील दंड, व्याज माफ केले जाईल, अशी घोषणा ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दीपनगर (ता. भुसावळ) येथे केली.

भुसावळ 6600 मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक वीज प्रकल्पाचे भूमिपूजन, विविध ठिकाणच्या वीज उपकेंद्रांच्या ई भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदामंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे आदी यावेळी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, की राज्यात जे 25 वर्षे जुने वीज प्रकल्प आहेत ते बंद करून नवीन प्रदूषणविरहित प्रकल्प सुरू करण्याचे केंद्र व राज्य शासनाने ठरविले आहे. "भेल' कंपनीने दीपनगरचा हा प्रकल्प घेऊन शासनास 900 कोटींचा लाभ मिळवून दिला आहे. येथील प्रकल्पग्रस्तांना स्थानक स्तरावर रोजगार प्रकल्पात देण्याबाबत "भेल'च्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला ट्रान्स्फॉर्मर
'शेतकऱ्यांचा विकास अखंडित वीज व पाणी मिळाले तरच होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू होईल. त्यासाठी गावागावात आम्ही सौर ऊर्जेचे पॅनल लावू. जो शेतकरी पन्नास, साठ हजार खर्च करू शकेल त्याला स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मर दिला जाईल. राज्यात सर्व पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या सौर ऊर्जेवर चालविण्यात येतील,'' असेही बावनकुळे म्हणाले.

Web Title: jalgaon maharashtra news chief minister solar agriculture scheme