विस्तारित मंत्रिमंडळात खडसेंना संधी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

जळगाव - राज्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे सर्वांनाच वेध लागले आहेत. या विस्तारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना चांगले खाते देण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजपमधील तेवढ्याच ताकदीचे एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमन होणार काय, याबाबत त्यांनी प्रश्‍नचिन्ह कायम ठेवले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पक्षाने कोकणात आपली ताकद वाढविण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या सूतोवाचानुसार राणे यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्‍चित झाले आहे. विस्तारित मंत्रिमंडळात खडसे यांचे पुनरागमन होईल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे.

पाकिस्तानात दाऊदच्या पत्नीशी संभाषण केल्याचा; तसेच पुण्याजवळील भोसरी येथील जमिनीत मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप खडसे यांच्यावर होता. यातील दाऊदशी संबंधाच्या आरोपात तथ्य नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. भोसरी येथील जमीन प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात न्या. झोटिंग यांच्या चौकशी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. मात्र, शासनाने तो अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही; परंतु या अहवालातही खडसे यांना "क्‍लीन चिट' असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच आधारावर पक्षनेतृत्वाकडून त्यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनास हिरवा कंदील मिळण्याची शक्‍यता खडसे समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. खडसे यांच्यासोबतच मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातून हरिभाऊ जावळे यांचे नाव घेतले जात आहे. त्याचबरोबर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांना डच्चू दिल्यास त्यांच्या जागी मंत्रिमंडळात गुजराथी चेहरा कोण असेल, याबाबतही तर्कवितर्क लावले जात आहेत.

हा विस्तार शेवटचा..?
राज्यातील विधानसभा निवडणुकीस दोन वर्षे बाकी आहेत. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील हा शेवटचा विस्तार असल्याचे सांगितले जात आहे. याच मंत्रिमंडळाच्या कामाच्या भरवशावर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आगामी निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहे. खडसे हे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे दमदार नेतृत्व आहे. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यास, तो आताच होईल; अन्यथा पुढे कोणतीही शक्‍यता नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

Web Title: jalgaon news khadse opportunity to expand the cabinet?