कर्तव्य बजावताना पोलिसांची अशीही माणुसकी 

कर्तव्य बजावताना पोलिसांची अशीही माणुसकी 

जळगाव ः डोळ्यासमोर महामार्गावर विव्हळत पडलेला गंभीर जखमी दुचाकीस्वार त्यात गुन्ह्यातील संशयित आरोपी गाडीत अशा द्विधा मनःस्थितीत असताना जिल्हा पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्य सोबत माणुसकी देखील काय असते, याचे चित्र  समोर उभे केले. गंभीर जखमीला उचलून उपचारासाठी कैदी गाडीतच जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करून पन्नास वर्षीय प्रौढाचे प्राण वाचविले. 

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून दोन दिवसापूर्वी दूरदर्शन टॉवर जवळ एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यात शुक्रवारी फैजपूरवरून लग्नसमारंभ आटपून जळगावकडे येणारे संजय कृष्णा कोळंबे (वय 50, रा. गुजराल पेट्रोलपंप परिसर, जळगाव) हे शालक महेंद्र भोळे (रा. पुणे) यांच्या सोबत येत होते. तरसोद फाट्याजवळ कोळंबे यांच्या दुचाकीला जळगावकडून जाणाऱ्या अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. यामुळे डंपरच्या मागील चाकात कोळंबे आल्याने त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर इजा झाली आहे. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. 

पीयुसीसाठी थांबले, अन झाला अपघात 
नातेवाइकांकडे लग्न समारंभ आटोपून कोळंबे व शालक भोळे हे दुचाकीने जळगावकडे येत होते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पीयूसीचे वाहन दिसल्याने कोळंबेंनी गाडी थांबवून भोळेंना खाली उतरविले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गाडी वळवीत असताना जळगावकडून भुसावळला वाळू घेऊन जाणारा डंपर (एमएच19, सीवाय 3124 ) दुचाकीला जोरदार धडक दिली. डंपरने दुचाकीला फरफटत नेले. यात डोक्‍यात हेल्मेट असल्याने कोळंबेंचे वाचले. मात्र पायाला गंभीर इजा झाली. 


पोलिसांनी केली मदत 
अपघात घडण्याच्या थोड्या अंतरावरून भुसावळ न्यायालयातून न्यायालयीन कामकाज आटपून जळगावला कारागृहात कैदींना घेऊन येणारी व्हॅन येत होती. चालक राजेंद्र पवार यांना अपघात घडताना दिसताच त्यांनी गाडी बाजूला लावली. यावेळी व्हॅन मध्ये खुनातील दोन आरोपी असताना सहायक फौजदार हेमचंद्र झोपे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील, रवींद्र महाले हे खाली उतरले. परंतु व्हॅनमध्ये खुनातील आरोपीला बघावे की जखमीला मदत करावी अशा द्विधा मनस्थीत असताना या पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवीत जखमीला व्हॅनमध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात आणले. तसेच डंपर चालक पंकज कोळी हा पळून जात असताना त्याला देखील पकडून व्हॅनमध्ये टाकून घेऊन आले. 

पोलिसांची विनंती तरी मदतीला कोणी येईना 
अपघात घडल्यावर कोळंबे गंभीर जखमी रस्त्यावर पडले होते. कोणी मदतीला अन्य वाहनधारक येत नव्हते. कोणी मोबाईल बहाद्दर तर व्हिडिओ काढत होते. पोलिस कर्मचारी मदतीसाठी विनवणी करून देखील कोणी येत नसल्याचे पाहून चार पोलिस कर्मचारी व शालक भोळेंनी जखमी कोळंबेंना कैदी वाहनातून रुग्णालयात तातडीने आणले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com