जलयुक्त शिवारमुळे परिसराचा कायापालट 

jalyukat shivar
jalyukat shivar

सोलापूर - महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्‍यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍याचा आवर्जून उल्लेख केला जातो. उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करणारे सांगोल्यातील महूद गाव आज पिण्याचे पाणी आणि शेतीबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. "जलयुक्त शिवार अभियाना'तून गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे गावामध्ये समृद्धी आली आहे. गावाचा परिसर हिरवाईने नटला आहे. 

संपूर्ण सांगोल्यासाठी वरदायिनी ठरलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना 81 गावांची तहान भागवते. माणसांची तहान भागली; पण शेतीचे काय? हा प्रश्‍न जलयुक्त शिवार योजना येण्यापूर्वी भेडसावत होता. सांगोला तालुक्‍यातील 81 गावांमध्ये महूद गावाचाही समावेश होता. दर महिन्याला तब्बल एक लाख रुपयांचे पाणी हे गाव विकत घेत होते. 18 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची तहान भागविण्यासाठी गावाने एकोपा दाखविला. राजकारणविरहित काम करण्याचा निर्धार केला. गावाची निवड 2016-17 मध्ये "जलयुक्त शिवार अभियाना'त झाली. गावापासून जाणाऱ्या कासाळगंगा ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण झाले. सुमारे पाच लाख रुपयांचे काम लोकसहभागातून झाले. दोन लाख 40 हजार घनमीटरचे जलसंधारणाचे काम झाल्याने महूदच्या कासाळगंगा ओढ्यात 1.31 टीएमसी पाणी साठले आहे. गावातील 250 एकर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली आले आहे. 

ओढ्याच्या रुंदीकरणासोबतच गावात दोन हजार 850 हेक्‍टरवर बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जलयुक्त शिवार अभियानाला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची जोड मिळाल्याने गावात फळबाग लागवड, गांडूळखत प्रकल्प साकारले आहेत. वर्षानुवर्षे पडिक असलेली शेती ओलिताखाली आली आहे. डाळिंबासाठी सांगोला तालुक्‍याने देशात ओळख मिळविली आहे. जलयुक्त शिवारमुळे सांगोल्याच्या डाळिंब क्षेत्रात वाढ झाली आहे. दुष्काळी सांगोला तालुक्‍यात महूद गावाने केलेली जलक्रांती पाहण्यासाठी वॉटरमॅन म्हणून ओळख असलेल्या राजेंद्रसिंह यांनी नुकतीच या गावाला भेट देऊन महूदच्या ग्रामस्थांचे कौतुक केले. 

जिल्हा नियोजन समितीही मदत करणार 
सांगोला तालुक्‍यातील कटफळमध्ये उगम पावलेल्या कासाळगंगा ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरणासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीने पुढाकार घेतला आहे. हा ओढा शेळवे (ता. पंढरपूर) येथे भीमा नदीला मिळतो. कटफळ ते शेळवेपर्यंत 42 किलोमीटरचा ओढा रुंद झाल्यास सांगोला, पंढरपूर तालुक्‍यातील 900 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या कामासाठी नियोजन समितीमधून निधी देण्याचा निर्णय पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com