‘जलयुक्त’मध्ये पानवडीची जिल्ह्यात बाजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

सासवड - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून पानवडी (ता. पुरंदर) गावाने बाजी मारली आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारात गावाला सन्मानचिन्हासह एक लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. या शिवाय विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही गाव पोचले आहे. 

सासवड - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून पानवडी (ता. पुरंदर) गावाने बाजी मारली आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारात गावाला सन्मानचिन्हासह एक लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. या शिवाय विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही गाव पोचले आहे. 

राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयाने ‘जलयुक्त’मधील (सन २०१५-१६) पानवडीच्या यशाबाबत कळविले आहे, अशी माहिती पुरंदर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली. पानवडीला परीक्षण पाहणीत जिल्हा समितीकडून दोनशेपैकी १९४ गुण मिळाले होते. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीमुळे येथील जलसंधारणाच्या कामास खरी गती आली. गावकऱ्यांनी ती ऊर्जा कायम टिकवून ठेवली आणि शासकीय निधीसह स्वयंसेवी संस्थांचा हातभार, श्रमदान आणि लोकवर्गणीमुळे हे गाव अल्पावधीतच पाणीदार झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद परजणे, बालाजी ताटे यांनी पानवडीला भेट देऊन कामाबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले आहे.  

पानवडी गावात पश्‍चिम घाट विकास योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आणि इतर योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे ३२५.२५ टीसीएम पाणी अडविण्यात आले. जलयुक्त अभियानातून २१७.१० टीसीएम असे एकूण ५४२.३५ टीसीएम पाणी अडविण्याची क्षमता गावात निर्माण झाली. या कामांमुळे यंदा पाऊस कमी होऊनही विहिरींच्या पाणीपातळीत दोन मीटरने वाढ झाली. सरपंच आणि पंचायत समिती सदस्य नलिनी लोळे, उपसरपंच संदीप भिसे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ लोळे, ग्रामसेविका सुनीता संकपाळ आदींच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. 

Web Title: Jalyukat shivar abhiyan