दुष्काळाच्या तडाख्यात जलयुक्त शिवार कोमेजले

दुष्काळाच्या तडाख्यात जलयुक्त शिवार कोमेजले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान दुष्काळाच्या तडाख्यात कोमेजले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत १६ हजार गावांत विविध कामे हाती घेण्यात आली. फेब्रुवारी २०१८ पर्यंत ६ हजार २३० कोटींच्या खर्चातून २२ लाख ७४ हजार हेक्‍टर सिंचनक्षमता निर्माण झाली. ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत हाच खर्च ७ हजार ६९२ कोटींपर्यंत पोचला. १६ लाख ८२ हजार टीसीएम पाणी उपलब्ध झाले. मात्र, गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्याने यंदा अभियानातील कामांची गती धीमी झाली, लोकसहभागही कमी झाला.

नाशिकमधील ६७७ गावे जलयुक्त
नाशिक जिल्ह्यातील १ हजार ९६४ गावांपैकी आतापर्यंत अभियानांतर्गत ९४९ गावांची निवड करण्यात आली. विविध यंत्रणांच्या माहितीनुसार, ६७७ गावे आतापर्यंत जलयुक्त झाली आहेत. २०१५-१६ पासून २०१८-१९ पर्यंत २३ हजार ८५५ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी ६५६ कोटी ७१ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत २२ हजार १८२ कामे पूर्ण झाली असून, त्यावर ४५९ कोटी ५३ लाख खर्च झाले आहेत. यंत्रणांनी ५२.६९ लाख, तर लोकसहभागातून ३२.२८ लाख, असा एकूण ८४.९७ लाख घनमीटर गाळ काढला. त्यातून १ लाख १३ हजार ७७८ टीसीएम क्षमता निर्माण झाली. मात्र, दुष्काळामुळे ९०१ गावे-वाड्यांमधील पाच लाख जनतेला २५६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

वरुणराजाने पळविले तोंडचे पाणी
सोलापूर जिल्ह्यात यंदा ३८ टक्के पाऊस झाल्याने कामे होऊनही दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत ६५३ गावांमध्ये अभियान राबविण्यात आले. अभियानाच्या कामातून जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा झाला. अभियानाच्या पहिल्या वर्षी बमळेगाव (ता. बार्शी) राज्यात पहिले आले. गेल्या वर्षी महूद (ता. सांगोला) गावाला देशातील पहिल्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला. पण, वरुणराजाच्या दांडीने साऱ्यांच्या तोंडचे आता पाणी पळाले.

जलयुक्तनंतरही गावे तहानलेली
जळगाव जिल्ह्यातील ४५४ गावे जलयुक्त झाल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती. मात्र, जिल्ह्यात ५२१ गावे सद्यःस्थितीत तहानलेली आहेत. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये २३२ गावांची निवड केली होती. या गावात ७ हजार ४०७ कामे करण्यात आली. २०१६-१७ मध्ये २२२ गावांमध्ये ४ हजार ८५७ कामे झाली. तिसऱ्या टप्प्यात २०६ गावांमध्ये ४ हजार ८९ कामे घेतली. चौथ्या टप्प्यात २३५ गावांमध्ये ४ हजार ४२६ कामे सुरू आहेत. आतापर्यंत ४७३ कोटी खर्च झालेत. उन्हाच्या तीव्रतेबरोबर कामांमधील पाणी आटल्याने पाणीटंचाई 
निर्माण झाली.

सकारात्मक परिणामांची नांदी
अमरावती जिल्ह्यात अभियानातून १७ हजार २२२ कामे करण्यात आली असून, तीन वर्षांत ७७ हजार ६०५ टीसीएम क्षमता निर्माण झाली. त्यासाठी चार वर्षांत ३८८ कोटी १६ लाख खर्च झाले. यवतमाळमध्ये २०१७-१८ मध्ये अभियानात ३२४ गावे निवडली. कामातून २३ लाख ५०२ टीसीएम जलसंचय झाला. त्यामुळे जिल्ह्यात टंचाई कमी झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात भात खाचर, नाला सरळीकरण, गाळ उपसा अशी कामे झाली. भंडाऱ्यात ६५ गावांत ९९ कामे पूर्ण झाली. त्यातून ५ हजार ४१० टीसीएम जलसाठा  झाला. 

त्यामुळे १ हजार ४३३ हेक्‍टरला एकवेळचे पाणी उपलब्ध झाले. वर्धा जिल्ह्यात १३४ गावांत एक हजार ४२ कामे झाली. पण, त्याचा फारसा लाभ झाला नसल्याचे दिसते. चंद्रपूर जिल्ह्यातील ५९६ गावांत अभियान राबविण्यात आले. या योजनेचे सकारात्मक परिणाम आता जाणवू लागले आहेत. आतापर्यंत एक लाख २० हजार २६८ हेक्‍टरला एक  वेळचे पाणी मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com