'मग कळेल जनता कुणाच्या पाठीमागे आहे ते?'; जयंत पाटलांचे विधानसभेत आव्हान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

सध्या तुमच्या पक्षात असलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे आमच्या पक्षात येऊन बसतील, अशी टिप्पणी देखील त्यांनी या वेळी केली.

मुंबई : ''मुख्यमंत्र्यांकडे जर खरीच ताकद असेल, हिंमत असेल, तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा,'' असे आव्हान राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी आज (सोमवार) विधानसभेत केले.

आगामी विधानसभा निवडणूक जुन्या पद्धतीने घेऊन दाखवा, मग महाराष्ट्रातील जनता कुणाच्या मागे आहे, हे तुम्हाला कळेल, असा इशाराच जणू पाटील यांनी यावेळी दिला. सध्या तुमच्या पक्षात असलेले राधाकृष्ण विखे-पाटील हे आमच्या पक्षात येऊन बसतील, अशी टिप्पणी देखील त्यांनी या वेळी केली. 

सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. तसेच ईव्हीएमवरून देशभरात गोंधळही सुरू आहे. त्यात महाराष्ट्रासह देशातील इतर काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक जुन्या पद्धतीने घेण्यासाठी ठराव करण्यात यावा, तसेच निवडणूक आयोगाला ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची विनंती करण्यात यावी, म्हणजे 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल, असे प्रतिपादन पाटील यांनी विधानसभेत केले. 

जयंत पाटील यांनी ईव्हीएमबाबत जी भूमिका मांडली आहे त्याला माझं समर्थन आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant patil challenges in Legislative Assembly toaday