शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करतेय - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे.

मुंबई - पीक विम्यासंदर्भात विमा कंपन्यांवर मोर्चा काढून शिवसेना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला आहे.

आज शिवसेनेमार्फत जो मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये फक्त शिवसैनिक होते. महाराष्ट्रातील शेतकरी कुठे होते असा सवालही जयंतराव पाटील यांनी केला आहे. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पिळवणूक ज्या विमा कंपन्यांनी केली आहे त्यावर तोडगा निघू शकतो.मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. परंतु सरकारची मर्जी दिसत नाही. दुर्दैवाने सत्तेतील एक पक्ष विरोधी पक्षाची भूमिका घेवून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे अशी जोरदार टीकाही जयंतराव पाटील यांनी केली. 

नुसता मोर्चा काढून शिवसेनेला हात झटकता येणार नाहीत. सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी निर्णय घ्यायचे असतात. रस्त्यावर उतरून मोर्चे काढायचे नसतात हे शिवसेनेला कुणी तरी सांगायची गरज आहे असा टोला जयंतराव पाटील यांनी लगावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil Criticise on Shivsena Over Insurence Company Morcha