राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील

रविवार, 29 एप्रिल 2018

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. 

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष निवडीचे काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. 

गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींच्या नावांची चर्चा सुरू होती. माजी मंत्री. ज्येष्ठ नेते आणि विधिमंडळ कामकाजाचा अनुभव असलेल्या जयंत पाटील यांचे पारडे जड होते. त्यामुळे ही सगळी नावे मागे पडून जयंत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब आज करण्यात आला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार असल्याने प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. 

यावेळी राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नवाब मलिक, खजिनदारपदी हेमंत टकले, सरचिटणीसपदी शिवाजीराव गर्ज़े यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांच्या नावाची सुचना केली. त्यास शशिकांत शिंदे, आणि धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, फौजिया खान, चित्रा वाघ ,हसन मुश्रीफ, डी. पी त्रिपाठी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनात जयंत पाटील यांनी सरकारविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. तटकरे यांनी गेली चार वर्षे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता त्यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसदी निवड झाली आहे. 

Web Title: jayant patil new ncp state president