
"शिंदे गटाच्या चार ते पाच जागा निवडून येऊ शकतात" भाजपचा सर्वे, जयंत पाटील म्हणाले...
आगामी विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपा २४० जागा लढवेल आणि शिंदे गट ४८ जागा लढवेल असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, आज त्यांच्या वक्तव्याचे पडसाद विधान भवनात उमटल्याचे दिसत आहेत. बावनकुळेंच्या या विधानावर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील यांनी भाजप आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकांसाठी अजून एक ते वर्षांचा अवधी शिल्लक आहे. तोपर्यंत शिंदे गटाचं नामोनिशाण शिल्लक राहणार नाही.
भाजप २०२४ ला २८८ जागांवर निवडणूक लढवेल. आणि भाजप हा पक्ष महाविकास आघाडीच्या विरोधात एकटा निवडणूक लढवेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपर्यंत शिंदे गट विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकेल असं वाटत नाही.
मला खात्री आहे की शिंदेंना ऐनवेळी सांगितलं जाईल की त्यांच्या चार ते पाच फक्त जागा निवडून येऊ शकतात. कारण भाजप सातत्याने सर्वे करत आहे.
भाजपाकडून सातत्याने स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम करत आहे. मित्र असो किंवा शत्रू असो त्यांना नामोहरम करणं हाच भाजपाचा एक कलमी कार्यक्रम असतो असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनीही यावरून शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
“हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने २०१४ मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर ४०-४५ जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही. राज्याचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला ४० जागा देऊ, २५ जागा देऊ उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपाने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरारा संपवायचा होता” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.