"राष्ट्रवादी'च्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी पक्षाचे विधिमंडळातील गटनेते जयंत पाटील यांची पक्षाच्या राज्य कार्यकारिणीत आज एकमताने निवड करण्यात आली. अन्य पदाधिकाऱ्यांची निवड येत्या दहा दिवसांत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ""राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरू. येत्या चार महिन्यांत पक्षाध्यक्षांना अपेक्षित अशी संघटना उभी करण्याचा प्रयत्न करू, असे सांगत यापुढे कामगिरी पाहूनच पदे दिली जातील, असे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले. तटकरे यांच्याकडे गेली चार वर्षे असलेल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली. पक्षाच्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल, डी. पी. त्रिपाठी, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते. बैठकीचे कामकाज सुरू होताच, प्रदेशाध्यक्षपदासाठी तटकरे यांनी पाटील यांच्या नावाचा ठराव मांडला. मुंडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे-पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदी पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. 

पाटील म्हणाले, ""पक्षात प्रत्येकाची कामगिरी पाहिली जाईल. प्रत्येक तालुक्‍यातील गावांमध्ये पक्षसंघटना आणि बूथ कमिटी पोचविणार आहे. या कमिट्यांच्या माध्यमातून दोन लाख सदस्यांचे जाळे उभे करू. अजित पवार कधी तरी दोन मिनिटे मोठ्याने बोलतात; पण लगेचच शांतपणे बोलतात. त्यामुळे अजित पवारांशी बोलताना संयमाने बोलायला हवे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. 

दरम्यान, पाटील तुमचा पायगुण चांगला असेल. राज्यात आणि केंद्रात पुन्हा आपली सत्ता येईल, अशा शब्दांत पटेल यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर "माझा पायगुण चांगलाच आहे,' असे पाटील म्हणाले. मुंडे आपल्या भाषणात म्हणाले, ""जयंत पाटलांच्या नावात जय आहे. त्यामुळे पक्षाला यश नक्की आहे.'' 

तटकरे पक्ष सोडणार, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर खुलासा करताना तटकरे म्हणाले, ""माझ्या रक्तात राष्ट्रवादी आणि पवार आहेत. पक्ष सोडण्याचा विचार जरी माझ्या मनात आला तरी, मी आत्महत्या करेन. गेल्या चार वर्षांत पक्षासाठी खूप काही करता आले.'' 

नव्या चेहऱ्यांना संधी द्या! 
"जयंतराव, तुमच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. तुम्हाला विनंती आहे, आता पदाधिकारी निवडताना नव्या चेहऱ्यांना संधी द्या,' असे आवाहन अजित पवार यांनी केले. ""आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही उत्तम "बॅटस्‌मन' आहात. गोलंदाजही आहात. रोहित शर्माने मुंबईला जिंकून दिले. तसे तुम्हाला पुढील निवडणुका जिंकायच्या आहेत,'' असे पवार म्हणाले. 

Web Title: Jayant Patil state president NCP