राज्यातील 16 हजार विद्यार्थ्यांनी दिली 'जेईई' परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - देशातील 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीज्‌मधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जवळपास 11 हजार 500 जागांसाठी देशभरातील जवळपास एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी रविवारी जेईई ऍडव्हान्स ऑनलाइन परीक्षा दिली. यात महाराष्ट्रातील जवळपास 16 हजार विद्यार्थी, तर पुण्यातील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार आहे.

पुणे - देशातील 23 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीज्‌मधील (आयआयटी) अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जवळपास 11 हजार 500 जागांसाठी देशभरातील जवळपास एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी रविवारी जेईई ऍडव्हान्स ऑनलाइन परीक्षा दिली. यात महाराष्ट्रातील जवळपास 16 हजार विद्यार्थी, तर पुण्यातील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर होणार आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या जेईई मुख्य परीक्षेतील दोन लाख 31 हजार 24 विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मात्र, त्यातील जवळपास एक लाख 66 हजार विद्यार्थ्यांनी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केला. ही परीक्षा यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. जुन्या आठ आणि नव्याने निर्माण झालेल्या पंधरा, अशा एकूण 23 आयआयटीज्‌मधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली.

विद्यार्थिनींसाठी 14 टक्के जागा
आयआयटीमधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या प्रमाणातील समतोल साधला जावा, यासाठी कौन्सिल ऑफ इंडियन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यांच्या वतीने प्रत्येक आयआयटीमधील प्रवेशात विद्यार्थिनींसाठी 14 टक्के जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयआयटीमधील अभियांत्रिकी शिक्षणासाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

'गेल्या वर्षीच्या परीक्षेपेक्षा यंदाची परीक्षा तुलनेने अवघड होती. यापूर्वीच्या परीक्षांमध्ये पूर्णसंख्येचे उत्तर असणारे प्रश्‍न असायचे. यंदा पूर्णांक असलेल्या संख्यात्मक प्रश्‍नांची संख्या जास्त होती. एकूण 108 प्रश्‍नांपैकी 48 प्रश्‍न हे याच स्वरूपाचे होते. पेपर एक 180 गुण, पेपर दोन 180 गुण, अशा एकूण 360 गुणांची ही परीक्षा होती. मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा कट ऑफ कमी असेल.''
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्र

'जेईई ऍडव्हान्सच्या 2016 मधील परीक्षेपेक्षा यंदाची परीक्षा तुलनेने सोपी होती. भौतिकशास्त्राचे प्रश्‍न तुलनेने सोपे होते. मात्र, पेपर एकपेक्षा पेपर दोन अवघड होता. गणितातील प्रश्‍न सोडवायला खूप वेळ लागला. तर, रसायनशास्त्रातील प्रश्‍न अवघड होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.''
- वैभव बाकलीवाल, संचालक, बाकलीवाल ट्युटोरिअल्स प्रायव्हेट लिमिटेड

'पेपर एकपेक्षा पेपर दोन सोडवायला वेळ लागला. पेपर दोन तुलनेने अवघड होता. आयआयटी कानपूरच्या वतीने मॉक टेस्ट होत्या, त्या वेळी ऑनलाइनमध्ये प्रश्‍नपत्रिका अगदी सहजपणे माऊसच्या साहाय्याने स्क्रोल होत होती. परंतु, नऱ्हे-आंबेगाव येथील परीक्षा केंद्रावर परीक्षेवेळी स्क्रोलिंग करताना सर्वच विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या.''
- मानसी घाडगे, विद्यार्थिनी

Web Title: JEE exam by 16000 student education