धर्मेंद्र यांना राज कपूर पुरस्कार; विजय चव्हाण यांना व्ही. शांताराम चित्रगौरव

Jeevangaurav-Award
Jeevangaurav-Award

मुंबई - राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना, तर चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते विजय चव्हाण आणि चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांना घोषित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे या पुरस्कारांची घोषणा केली.

मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, तसेच राज कपूर जीवनगौरव व राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार पाच लाख रुपयांचा, तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयांचा आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या दिलीप प्रभावळकर, श्रावणी देवधर, श्‍याम भूतकर; तर राज कपूर पुरस्कारासाठी सदस्य असलेल्या नाना पाटेकर, समीर (गीतकार), सुरेश ओबेरॉय समितीने सन 2018 च्या पुरस्कारांसाठी निवड केली.

चित्रपटसृष्टीत 1960मध्ये पदार्पण केलेल्या धर्मेद्र यांनी आतापर्यंत सुमारे 250 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. बिमल रॉय, जे. पी. दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले आहे. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमामालिनी, रीना रॉय, जयाप्रदा या अभिनेत्रींबरोबर त्यांनी काम केले आहे. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादों की बारात या चित्रपटांमुळे ते ऍक्‍शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमामालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली वीरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक अशी राजकुमार हिरानी यांची ओळख आहे. विधू विनोद चोप्रा यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाला सुरवात केली. त्यांनी स्वतः प्रमुख दिग्दर्शक म्हणून मुन्नाभाई एम.बी.बी.एस. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर हिरानी यांनी "लगे रहो मुन्ना भाई' व "3 इडियट्‌स' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून, हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाले. राजकुमार हिरानी यांना आजवर फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

विजय चव्हाण हे मराठी चित्रपटसृष्टीत सहायक कलाकार म्हणून आले. ज्याकाळी मराठीतच काय, हिंदी चित्रपटसृष्टीतही सहायक कलाकाराला योग्य स्थान मिळाले नव्हते, तेव्हा विजय चव्हाण यांनी हा सहायक कलाकार मोठा केला. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक.

मृणाल कुलकर्णी यांनी मराठी-हिंदी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी या तिन्ही क्षेत्रांत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रमा माधव या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनातून त्यांनी दिग्दर्शिका म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षण घेत असताना स्वामी या मालिकेतून मृणाल कुलकर्णी यांनी अभिनय कारकिर्दीला सुरवात केली. राजवाडे अँड सन्स, कशाला उद्याची बात, यलो या मराठी चित्रपटांमध्ये मृणाल यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यासोबतच आशिक, राम गोपाल वर्मा की आग, रास्ता रोको, छोडो कल की बातें, मेड इन चायना या हिंदी चित्रपटांमधूनही त्या झळकलेल्या आहेत. राजा शिवछत्रपती, मीरा, स्पर्श, गुंतता हृदय हे, अवंतिका या टीव्ही मालिकांद्वारेही त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com