समुद्रात जेलीफिशचा हल्लाबोल मच्छीमार हैराण 

समुद्रात जेलीफिशचा हल्लाबोल मच्छीमार हैराण 

सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या समुद्रात जेलीफिशने हल्लाबोल केल्यामुळे मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या उपद्रवी माशांचे प्रमाण कमी झाले असले तरी, सिंधुदुर्गात वाढतच आहे. याचा थेट परिणाम मासेमारीवर होतो आहे. 
जेलीफिश, अर्थात झार हा मच्छीमारांसाठी उपद्रवी मासा मानला जातो. तो सर्रास समुद्रात आढळतो; मात्र जानेवारीपासून त्याचे प्रमाण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यांत अचानक वाढले आहे. अलीकडे रत्नागिरीत याचे प्रमाण घटले असले तरी, सिंधुदुर्गात लाखोंच्या संख्येने जेलीफिश किनाऱ्याकडे सरकत आहेत. अगदी रापण पद्धतीच्या किनाऱ्यावर खच पडलेला दिसत आहे. यामुळे मच्छीमार पुरता हैराण झाला आहे.
 
पारदर्शक असलेला जेलीफिश अंगावरील काट्याने हल्ला करतो. ते शरीराला टोचल्यास पुरळ उठतात. हा त्रास काही आठवडे राहतो. जेलीफिशचे प्रमाण वाढल्यामुळे मच्छीमार सहसा मासेमारीला जात नाहीत. शिवाय हा मासा जाळ्यातून बाहेर काढणे कंटाळवाणे काम असते. जेलीफिश मोठ्या प्रमाणात माशांची अंडी, प्लवंग खात असल्याने त्यांची वाढलेली संख्या मत्स्योत्पादनावर विपरित परिणाम करते. सध्या लाखोंच्या संख्येने जेलीफिशचे थवे मासेमारी क्षेत्रात आढळत आहेत. मासे मिळण्याचे प्रमाणही घटले आहे. समुद्रात बेकायदा एलईडी (प्रकाशझोतातील) फिशिंगचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या वातावरणाचा अंतर्गत सागरी प्रवाहांवरही परिणाम झाला आहे. यामुळे जेलीफिश वाढल्याची शक्‍यता मच्छीमार वर्तवत आहेत. 

जेलीफिशची वाढलेली संख्या हे सागरी परिसंस्थेतील अन्न साखळीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. अनियंत्रित मासेमारीचा हा परिणाम असू शकतो. 
- डॉ. केतन चौधरी, सागरी मत्स्यजीव अभ्यासक 

इतक्‍या मोठ्या प्रमाणात जेलीफिश मिळण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच घडत आहे. याचा मासेमारीवर परिणाम जाणवत आहे. जानेवारीपासून मासे मिळण्याचे प्रमाणही घटले आहे. 
- रविकिरण तोरसकर, सदस्य, नॅशनल फिश वर्कर फोरम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com