
Jitendra Awhad : ...तर तिच परिस्थिती तुमच्यावर येईल तेव्हा..." ; आव्हाडांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच शाब्दिक वार सुरू झाला आहे. यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वैर असल्याची चर्चा आहे. जितेंद्र आव्हाड सातत्याने एकनाथ शिंदे यांना सवाल करत आहेत. मात्र काल शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर सभागृहात ताशेरे ओढले.
एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांविरुद्ध असलेल्या गुन्ह्यातील फोटो सभागृहात दाखवला. दरम्यान यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार पलटवार केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, "काल विधानसभेमध्ये विरोधी पक्षातील कोणिही सदस्य उपस्थित नसतांना आणि मी स्वत: सभागृहामध्ये उपस्थित नसतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमुसे प्रकरणात मी कसा दोषी आहे याचा पाढा वाचून दाखवला. एकतरं न्यायप्रविष्ठ प्रकरण असतांना मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं म्हणजे एकतर पोलिसांवर दबाव आणण्यासारखं आहे आणि जे साक्षीदार आहेत त्यांच्यावर देखिल मानसिक दबाव आणण्यासारखे आहे.
सत्तेचा गैरवापर हे सरकार करत आहे. अनेक शिवसैनिकांची घरं-दारं उध्वस्त केली. तेव्हा कायदा, न्याय व्यवस्था काहीच दिसलं नाही. केवळं मालकाची पत्नी उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर दिसली म्हणून हॉटेल तोडणारे आज आम्हांला कायदा व सुव्यवस्था शिकवायला सभागृहात बोलत होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
आतापर्यंत ६ महिन्यांत किती जणांचे संसार उध्वस्त केले याचा हिशोब करा. माझा एक साधा सरळ आपल्याला प्रश्न आहे. जो फोटो माझा करमुसेने लावला होता तसा फोटो तुमचा मी लावतो. बघुयात आपल्याला किती सहन होतं ते. करमुसेची पूर्ण बाजू सर्वोच्च न्यायालयात आपणच लढवलीत हे अख्ख्या जगाला माहित आहे. आपणच मला विधानसभेत दम दिला होता की, तुझी एक चौकशी आमच्याकडे आहे लक्षात ठेव, असे आव्हाड म्हणाले.
दमदाटीने राजकारण करता येत नाही, दमदाटीने सरकार चालवता येत नाही. जे आहे ते न्याय आहे. पण, एखाद्या मुख्यमंत्र्यांना न्यायप्रविष्ठ प्रकरण असतांना सभागृहात बोलणे हे कायद्याला धरुन नाही. हे आपल्या लक्षात आलं असतं तर बर झालं असतं. पण, अर्थात आपल्याला कायदा मान्यच नाही हे आपल्या वागण्यावरुन गेल्या ६ महिन्यांत दिसून आलं आहे, असा टोला देखील जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.


जितेंद्र आव्हाड म्हणाले, तोंडात येईल ते बोलायचं. सभागृहाचा सन्मान किंवा विरोधी पक्षातील आमदारांचा सन्मान हा आपल्या लेखीच नाही. अर्थात आम्हीही लढायला तयार आहोत. फक्त एवढच लक्षात ठेवा. जे करमुसेने माझ्या बाबतीत केलं ते कोणितरी आपल्याबाबतीत करेल तेव्हा बघुयात आपली किती सहनशीलता आहे ते.
एकनाथ शिंदे काय म्हणाले होते -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जितेंद्र आव्हाड सभागृहात नाहीत त्यांनी कायदा सुव्यवस्था याबाबतीत एवढा मोठा आकांततांडव केला. राज्यात, ठाण्यात गुंडागर्दी झाली. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले, असे आव्हाड म्हणाले. मात्र मी सांगू इच्छितो की, त्यांनी जे काही कृत्ये केलेले आहे, त्यांच्या लोकांनी केली आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अनंत करमुसे यांच्या मारहाणीचा फोटो सभागृहात दाखवला.