तावडेजी, आव्हाडांनी बापाचं नाव सांगणार नाही हे सिद्ध करून दाखवलंय

सागर आव्हाड
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

मावळत्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात काही मुद्यावरून चर्चा सुरू असताना आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना तावडे यांनी आव्हाडांना टोला लगावला होता.

पुणे : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. विधीमंडळ अधिवेशनात विनोद तावडे यांनी दिलेले आव्हान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण करून दाखवलं. या दोघांमध्ये एका मुद्यावरून विधानसभेत वाद झाला होता. या वादातून तावडे यांनी आव्हाड यांना चिमटा काढला. प्रत्यक्षात हा चिमटा काढणारे घरी बसले आणि आव्हाड पुन्हा सभागृहात आले.

मावळत्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात काही मुद्यावरून चर्चा सुरू असताना आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यास प्रत्युत्तर देताना तावडे यांनी आव्हाडांना टोला लगावला होता.

''आव्हाडांना सर्व विषय मार्गी लागल्यावर बोलायचं सुचतं. ते पुन्हा विधानसभेत येतील की नाही, हे माहीत नाही. त्यामुळे त्यांना बोलु द्या, असे तावडे यांनी म्हणताच  आव्हाड चिडून जागेवरून उठले आणि मी माझ्या मतदारसंघात 75 हजार मतांनी विजयी नाही झालो तर बापाचे नाव सांगणार नाही. मी तावडेंसारखा दुसऱ्याच्या मतदारसंघात उभा राहत नाही. खासदार गोपाळ शेट्टींच्या जिवावर निवडून येणाऱ्यांनी माझ्याविषयी बोलू नये, असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. या दोघांतील वादात शेवटी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना हस्तक्षेप करावा लागला होता.

निवडणुका लागल्यानंतर सारे चित्र बदलले. आव्हाड सभागृहात येतील की नाही, अशी शंका घेणारे तावडे यांना भाजपने तिकिटच दिले नाही. ते निवडणुकीला सुद्धा उभे राहू शकले नाहीत. दुसरीकडे आव्हाड यांनी आपल्या मुंब्रा मतदारसंघात दणकेबाज विजय मिळवला.

मुंब्रा- कळवा मतदारसंघातून आव्हाड यांना 1 लाख 9 हजार 14 मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना 33 हजार 497 मते मिळाली. तावडे यांना 75 हजार मताधिक्याचे आव्हान देणारे आव्हाड हे 75 हजार 517 मतांनी विजयी झाले.

तावडे यांनी असेच आव्हान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिले होते. चव्हाण यांचा पराभव निश्चित असल्याने त्यांनी निवडणुकीला उभेच राहू नये, असा सल्ला देऊन तावडेंनी त्यांना डिवचले होते. तेव्हाही चव्हाणांनी तावडेंनी सल्ला देण्याची गरज नसल्याचे सांगत आपल्या स्वतःच्या मतदारसंघाचे त्यांनी पाहावे, असे उत्तर दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad challenge to Vinod Tawde before Maharashtra assembly election