12 जिल्ह्यांचा प्रवास जीवघेणा ! 24 हजारांवर मृत्यू; निकषांमुळे मृत्यूनंतरही मिळेना मदत 

3corona_605 - Copy.jpg
3corona_605 - Copy.jpg

सोलापूर : राज्यातील 35 जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आता दहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. दुसरीकडे पाहता पाहता मृतांची संख्या 27 हजार 500 हून अधिक झाली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर, रायगड, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, पालघर आणि सांगली या 12 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आठ लाख रुग्ण आढळले असून 24 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. दरम्यान, कोरोनाने मृत्यू झालेला कर्मचारी 14 दिवसांपूर्वी कोरोना ड्यूटीवर असायला हवा, असा निकष लावल्याने अनेकांना मृत्यूनंतरही मदत मिळू शकलेली नाही. कोरोनाने घरातील कर्ता व्यक्‍ती गेल्यानंतर कुटुंबाची आवस्था बिकट झाली असून त्यांना मदतीसाठी हात पसरावे लागत असल्याचेही चित्र पहायला मिळत आहे.

ठळक बाबी... 

  • राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झाली साडेनऊ लाख 
  • सोलापुरसह राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये तब्बल आठ लाख रुग्ण 
  • राज्यभरातील मृतांची संख्या आता 27 हजार 407 झाली 
  • राज्यातील 12 जिल्ह्यात तब्बल 24 हजारांहून अधिक मृत्यू 
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले, परंतु वाढलेल्या मृत्यूने वाढविली चिंता
  •  

'मिशन बिगिन अगेन'अंतर्गत राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवली आहे. तत्पूर्वी, केंद्र सरकारने त्यादृष्टीने निर्देश दिले असून आता आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासचे बंधन नसणार आहे. टप्प्याटप्याने राज्य सरकारने उद्योग व व्यवसायला सशर्त परवानगी दिली आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर आणि जिल्हाबंदी उठवून ई-पासची अट रद्द केल्याचाही परिणाम असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मुंबई, पुण्यासह मोठ्या शहरांमधील ये-जा वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून को-मॉर्बिड रुग्णांचा सर्व्हे ठिकठिकाणी सुरु असून ग्रामीण भागात ऍन्टीजेन टेस्टवर भर दिला जात आहे. त्यातून अनेक छुपे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. तर उशिरा दाखल होणाऱ्या रुग्णांचा मृत्यूचा वेग वाढत असल्याचे चित्र आहे. जळगाव, सोलापूर, पुणे, नागपूर या जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आटोक्‍यात येत नसल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. तरीही परिस्थिती बदललेली दिसत नाही. काही जिल्ह्यांमध्ये ऑक्‍सिजन तर काही जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर कमी असल्याची चर्चा सुरु झाली असून कोविड केअर सेंटरमधील दुरावस्थाही रुग्णवाढीस कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. 


जिल्हानिहाय रुग्ण अन्‌ मृत्यू (धोकादायक जिल्हे) 

  • जिल्हा      रुग्ण              मृत्यू 
  • मुंबई       1,58,756      7,942
  • ठाणे       1,46,220      4,008
  • पुणे        2,07,435      4,538
  • नागपूर      40,861       1,108
  • नाशिक     48,316         989
  • जळगाव    32,553         951 
  • रायगड     36,449         872
  • सोलापूर    23,827         867
  • कोल्हापूर  29,033         821
  • औरंगाबाद 26,262        710
  • पालघर     28,543        647
  • सांगली     20,205        596
  • एकूण      7,98,460    24,049
  •  

मृत्यूचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान 
राज्यात मागील महिनाभरात दररोज सरासरी 18 ते 19 हजार रुग्णांची भर पडू लागली आहे. तर मृतांची संख्याही सरासरी अडीचशे ते तीनशे झाली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत मृतांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्‍त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आता आगामी काळात राज्य सरकार कशाप्रकारे ठोस उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेकजण कोरोना ड्यूटी केल्यानंतर पॉझिटिव्ह येऊ लागले असून मृत्यूही वाढत आहेत. मात्र, शासनाच्या निकषांमुळे अनेकांना 50 लाखांची मदत मिळू शकलेली नाही.
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com