Jyotiba Temple : ज्योतिबाला खेट्याची सुरवात कशी झाली? हिमालयातील केदारनाथांशी आहे थेट कनेक्शन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiba Temple

Jyotiba Temple : ज्योतिबाला खेट्याची सुरवात कशी झाली? हिमालयातील केदारनाथांशी आहे थेट कनेक्शन!

कोल्हापूरातील वाडी रत्नागिरीवर जोतिबा देवांच्या खेट्यांना प्रारंभ झाला आहे. जोतिबाचा आज तिसरा खेटा आहे. माघ महिन्यात जोतिबा देवाला पाच खेटे घालण्याची प्रथा आहे. त्यानंतर येणाऱ्या चैत्र महिन्यात जोतिबा देवांची मोठी यात्रा असते.  

जोतिबाच्या खेट्यासाठी राज्यभरातून लाखों भाविक दरवर्षी येतात. माघ महिन्यात जोतिबा देवाचे पाच खेटे घातले जातात. या खेट्यांच्या निमिताने मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ज्योतिबाच्या खेट्यांना पहाटे चार वाजल्या पासून प्रारंभ होतो. कोल्हापूरातील पंचगंगा नदी काठी आंघोळ करून कोल्हापूरकर जोतिबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करतात आणि डोंगराच्या दिशेने चालू लागतात.

कोल्हापूरकरांच्या सर्वांच्याच घरचा कुलदैवत ज्योतिबा देव आहे. त्यामूळे खेट्याच्या दिवशी अख्ख कोल्हापूर जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी येते. पहाटे अंधारात हातात बॅटरी घेऊन ते अनवाणी पायांनी डोंगरावर दर्शनासाठी येतात. पूर्वीपासून खेट्यांची परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे. अगदी न चुकता कोल्हापूरकर खेट्यांसाठी आवर्जून येतात. पण हे खेटे कधीपासून आणि का घातले जातात. त्यामागील कथा काय आहे हे जाणून घेऊयात.

ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर

ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर

ज्योतिबांच्या या बाबतची आख्यायिका अशी आहे की, करवीर निवासिनीने कोल्हासूर राक्षसांच्या वधाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केले होते. त्यामूळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले. जेव्हा मोहिम फत्ते झाली तेव्हा ते माघारी परतू लागले. हे अंबा मातेला समजताच त्या आहे तशीच अनवाणी पळत देवांकडे आल्या. तेव्हा देव वाडी रत्नागिरी डोंगरावर पोहोचले होते.

अंबा मातेने ज्योतिबा देवांना करवीर नगरीच्या रक्षणासाठी त्याच डोंगरावर थांबण्याची विनंती केली. देवांनीही ती मान्य केली. साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबा देव त्या डोंगरावर स्थायिक झाले. आणि करवीर नगरीचं भाग्य उजळलं.

तेंव्हापासून कोल्हापूर ते जोतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजतागायत सुरु आहे. सध्या भाविक चालत तर कधी गाडीने खेटे घालतात. तर काही भाविक कुशिरे गावापर्यंत चालत जात तिथून गायमूख मार्गाने चालत डोंगरावर जातात.