जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस 

जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस 

जोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेचा उद्या (ता. 10) मुख्य दिवस आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. आज रविवार असल्याने राज्यभरातून भाविकांच्या झुंडी येत होत्या. दिवसभरात सुमारे दोन लाख भाविक डोंगरावर आले. उद्या हीच संख्या आठ ते दहा लाखांवर जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे डोंगरावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आज मंदिर व संपूर्ण गावातून "रॅन्चो' नावाचे श्‍वान फिरविण्यात आले. 

जलद कृती दल, व्हाईट आर्मी व घातविरोधी पथके सज्ज ठेवली आहेत. आज सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक महादेव तांबडे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी डोंगरावर हजेरी लवत यात्रेसंबंधी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

आज कोल्हापुरातील पंचगंगा घाटापासून चालत येणाऱ्या भाविकांमुळे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. कुशिरे, पोहाळे, वडणगे, निगवे या गावांतून डोंगराकडे जाणाऱ्या डोंगरवाटा हलगी-पिपाणीच्या सुरांनी व "चांगभलं'च्या जयघोषाने दणाणून गेल्या. सांगली, सातारा, कऱ्हाड, बीड, उस्मानाबाद या भागांतील भाविकांनी सासनकाठी खांद्यावर घेऊन डोंगर पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायी प्रवास केला. जोतिबा देवाची सायंकाळी बैठी सालंकृत महापूजा बांधली होती. 

भाविकांनी यमाईबाग परिसर, वाहनतळ चव्हाण तळे परिसर, पाण्याची टाकी, एस.टी. स्टॅंड या परिसरात राहण्यासाठी जागा निश्‍चित केल्या. 

तीव्र उन्हामुळे काही भाविकांना चक्कर आली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. 

आज सायंकाळी पाच वाजता निनाम पाडळी (सातारा), मौजे विहे (पाटण), कसबे डिग्रज (ता. मिरज), कसबा सांगाव (ता. कागल), मनपाडळे, दरवेश पाडळी (हातकणंगले), फाळकेवाडी, विठ्ठलवाडी, सांगलीवाडी यांच्यासह मानाच्या 96 सासनकाठ्या यमाई मंदिराकडे दाखल झाल्या. त्यांचे स्वागत पश्‍चिम महाराष्ट्र समितीचे पदाधिकारी, सचिव विजय पोवार, अधीक्षक लक्ष्मण डबाणे, देवसेवक, ग्रामस्थ पुजारी यांनी केले. त्यांना देवस्थानतर्फे मानाचा विडा देण्यात आला. 

त्यानंतर गजगतीने सासनकाठ्या शासकीय विश्रागृहामार्गे नवीन वसाहत, पाण्याची टाकी, शिवाजी पुतळ्यामार्गे दक्षिण दरवाजातून मुख्य मंदिराच्या आवारात आणल्या. जोतिबाच्या मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून "शिखर दर्शन' घेऊन ठरलेल्या जागी सासनकाठ्या ठेवल्या. 

आज भाविकांनी सासनकाठी व मंदिर शिखरांवर गुलाल-खोबरे उधळण्यासाठी गर्दी केली. गेल्या वर्षीपासून डोंगरावर खोबरे वाटी उधळण्यास शासकीय यंत्रणेने बंदी घातली असल्याने खोबरे वाटीचे तुकडे व्यापाऱ्यांनी केले आहेत. पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे, प्रांताधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांच्यासह पथकाने सर्व दुकानदारांची पाहणी केली आहे. 

दर्शन रांगेचा मार्ग यंदा शिवाजी पुतळा, गायीनजीकचा दरवाजा असा केला असून तेथे बॅरिकेड बसविले आहेत. 

मंदिर परिसरात भाविकांसाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटल, रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर, सनराईज, केखले आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय, सरकारी दवाखाना जोतिबा, व्हाईट आर्मी यांची आरोग्य पथके सज्ज ठेवली आहेत. पाच रुग्णवाहिकांची व्यवस्था केली असून व्हाईट आर्मीचे कार्यकर्ते मदतीसाठी दाखल झाले आहेत. सेंट्रल प्लाझा परिसरात त्यांनी यंदा वातानुकूलित तात्पुरता दवाखाना सुरू केला आहे. 

मंदिरात आज होणारे कार्यक्रम 
- पहाटे 3 वाजता घंटानाद 
- पहाटे 4 ते 5 श्रींची पाद्यपूजा, काकडआरती, मुखमार्जन 
- पहाटे 5 ते 6 शासकीय अभिषेक तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते 
- सकाळी 6 ते 7 पोशाख 
- सकाळी 8 ते 10 मंदिर दर्शनासाठी खुले 
- सकाळी 10 ते 12 धुपारती व अंगारा 
- दुपारी 1 वाजता सासनकाठ्यांची मिरवणूक 
- सायंकाळी 5.30 वाजता पालखी सोहळा व पालखी यमाई मंदिराकडे निघेल. 

पान-पीठ उपवास 
निनाम पाडळी (जि. सातारा) येथील पन्नास ग्रामस्थ पान-पीठचा उपवास करून जोतिबा चैत्र यात्रेसाठी गुरुवारी (ता. 5) गावातून अनवाणी पायाने निघाले होते. त्यांचे आज सकाळी नऊ वाजता डोंगरावर आगमन झाले. पान-पीठ उपवास म्हणजे ज्वारीचे पीठ-पाण्याबरोबर खाणे होय. आज या मंडळींनी पुरणपोळी खाऊन हा उपवास सोडला. 

आज मोफत बससेवा 
डोंगराच्या पायथ्याशी ज्या भाविकांनी आपली दुचाकी-चारचाकी वाहने पार्किंग केली आहेत, त्या भाविकांना डोंगरावर येण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने 40 केएमटी बसेसची मोफत व्यवस्था केली आहे. 

वॉकी टॉकी 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व पोलिस यंत्रणेकडे यंदा वॉकी टॉकीची सोय केली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनास मोठी मदत होणार आहे. 

चित्रीकरण 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने मुख्य मंदिर, परिसर मेन पेठ, यमाई मंदिर व परिसरात यंदा 16 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून याद्वारे संपूर्ण यात्रेचे चित्रीकरण केले जाणार आहे. त्यामुळे घातपाताच्या घटनांना आळा बसणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com