कालकुपी ः सोलापुरातील धर्मवीर संभाजी तलाव (कंबर तलाव) 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

बदलत्या सोलापूरचा इतिहास ः 09 
स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूर शहराचे वैभव असलेल्या धर्मवीर संभाजी तलावाची (कंबर तलाव) माहिती आज (बुधवारी) घेऊयात कालकुपी या सदरात. या तलावाच्या परिसरात मोठ्या योजना राबविण्याचे नियोजन आहे. 

सोलापूरः सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कंबर तलाव परिसराचे 1960-61 च्या सुमारास टिपलेले हे छायाचित्र. तलावनिर्मितीच्या शंभर-सव्वाशे वर्षांनंतर महापालिकेने या ठिकाणाचे सुशोभीकरण केले. 

हेही वाचा... कालकुपी भाग 1 ते 8
 

कंबर तलावाबाबत मतमतांतरे 
त्यामुळे हा परिसर खूपच खुलून दिसत आहे. हा तलाव "धर्मवीर संभाजी' या नावानेही प्रसिद्ध आहे. या तलावाला "कंबर तलाव' नाव का पडले, याबाबत मत-मतांतरे आहेत. काहीजणांच्या मते, या तलावात कोठेही उभारले, तरी कंबरेपर्यंतच पाणी होते. त्यामुळे हे नाव पडले, असे सांगण्यात येते; तर या तलावात कमळाची फुले मोठ्या प्रमाणात फुलायची. त्यामुळे "कमळांचा तलाव' म्हणून हा परिसर ओळखला जायचा. त्याचा अपभ्रंश होऊन, पुढे "कंबर तलाव' असा शब्द रूढ झाल्याचे सांगण्यात येते. तर विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारातील कमरुद्दीन नावाच्या सरदाराने हा तलाव खोदला. त्याच्याच नावाचा अपभ्रंश होऊन "कंबर तलाव' असे नामकरण झाले, असे काही जाणकारांचे मत आहे. 

हेही वाचा... या शहरात महाविकास आघाडीचा अस्त 
 

पाणीपुरवठ्याची योजना राहिली अर्धवट 
साधारणपणे 1854-55 च्या सुमारास शहराला सिद्धेश्‍वर तलावातूनच पाणीपुरवठा व्हायचा. मात्र, हे पाणी कमी पडू लागल्याने विजापूर रस्त्यावरील कंबर तलावातून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्या वेळी हा तलाव लष्करी अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता. तलावातील पाण्याचा उपयोग लष्करासाठी होत असल्याने प्रत्यक्षात त्यातून गावात पाणी आणणे अवघडच होते. तलावाच्या पश्‍चिम दिशेला असलेल्या मोतीबागेत पाण्याचे झरे होते. झऱ्याच्या ठिकाणी 40 फूट व्यासाची व 50 फूट खोल विहीर खोदून इंजिन बसवावे आणि गावात पाणी आणावे, असे नियोजन होते. मात्र ते फलद्रूप झाले नाही. तसेच हा तलाव लहान असल्याने मधून-मधून तो कोरडा पडण्याची शक्‍यता होती. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी या तलावावर अवलंबून राहणे शक्‍य नव्हते. त्यामुळे ही योजनाच अर्धवट राहिली. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: बाहेरील आणि पाणी

महापालिका झाल्यावर झाली विकासाची सुरवात 
नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यावर या ठिकाणी विविध प्रकारच्या सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. गावाबाहेरील सौंदर्यस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी काही प्रस्ताव तयार करून त्यांची अंमलबजावणीही झाली. नौकाविहाराची सोय करण्यात आली. मात्र, या परिसराचा खरा विकास झाला तो 2002 ते 2005 या कालावधीत. त्यासाठी तत्कालीन महापौर नलिनी चंदेले, उपमहापौर पद्माकर काळे, आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, नगर अभियंता सुभाष सावसकर व उद्यानप्रमुख ज्ञानराज म्हेत्रस यांनी सातत्याने प्रयत्न केले व पाठपुरावा केला. आज तलावाच्या परिसरात उद्यानाची निर्मिती करण्यात आली असून, राणी लक्ष्मीबाईचा अश्‍वारूढ पुतळा लक्ष वेधून घेतो. विजापूरहून सोलापूरकडे जाणारे पर्यटक व प्रवासी या ठिकाणी उतरूनच मग पुढे जातात. या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यात निश्‍चितच भर पडली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalkupi - 09 : dharmveer sanbhaji talav (kambar talav)