कोयना धरण निम्मे भरले! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

- नवजा येथे 24 तासांत तब्बल 300 मिलिमीटर पाऊस 
- कोयना धरणात चोवीस तासांत 4 टीएमसीने वाढ 
- कृष्णा-कोयनांसह अन्य नद्यांच्या पाणीपातळीत वाढ 
- दिवशी घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळित 
- कऱ्हाड-मसूर रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक खोळंबली 
- पूर्वेकडील तालुक्‍यांत दमदार पावसाची प्रतीक्षा 

पाटण/कऱ्हाड - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांत दमदार पाऊस सुरू असून, गेल्या 24 तासांत कोयना धरणातील पाणीसाठ्यात चार टीएमसीने वाढ होऊन एकूण पाणीसाठा 52.36 टीएमसी इतका झाला. एकूण 105.25 टीएमसी क्षमतेचे हे धरण निम्मे भरल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील तालुक्‍यांत मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 

कोयना धरणात सध्या 36 हजार 211 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. नवजा येथे गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 300 मिलिमीटर, महाबळेश्‍वरला 214, तर कोयनानगर येथे 204 मिलिमीटर पाऊस झाला. नवारस्ता-ढेबेवाडी मार्गावर घाटात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती. कऱ्हाड-मसूर रस्त्यावरही झाड पडून काही काळ वाहतूक विस्कळित झाली होती. पावसामुळे खोडशी बंधाऱ्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. मल्हारपेठ, तळमावले, काळगाव, कुंभारगाव, चाफळ, कोपर्डे हवेली परिसरांतही दमदार पावसाने शेतकरी समाधानी झाले आहेत. 

Web Title: karad news koyna dam rain patan news