पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल -  सुशीलकुमार शिंदे 

पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सरकार कोसळेल -  सुशीलकुमार शिंदे 

कऱ्हाड - आमच्या पक्षाचा यापूर्वी तीन वेळा पराभव झाला आहे. मात्र, तिन्ही वेळेस आमची सत्ता आली आहे. भाजपचे नेते ज्यावेळी कॉंग्रेस संपली, असे म्हणतात, त्या वेळी जनता ज्वालामुखीसारखी उसळून येऊन पुन्हा कॉंग्रेसला सत्तेवर बसवते, हा इतिहास आहे. हे मतलबी सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वास माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. विलासराव पाटील उंडाळकर यांची वैचारिक भूमिका समाजाशी बांधिलकी जपणारी असून, ते करारी आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून मला भावले, असेही ते म्हणाले. 

माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचा सुवर्णमहोत्सवी सत्कार सुशीलकुमार शिंदे व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. बुधाजीराव मुळीक, डॉ. भारत पाटणकर, उल्हास पवार, पत्रकार ज्ञानेश महाराव, विनोद शिरसाट, माजी खासदार जयवंतराव आवळे, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले, ""यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आम्ही राजकारणात कार्यरत आहोत. शरद पवार यांनी मला राजकारणात आणले. त्यामुळे मी पीडीएफ सरकारमध्ये गेलो. त्या वेळी कठीण काळ होता. त्या वेळीही आम्ही पक्षाच्या निष्ठेशी एकनिष्ठ राहून काम केले. त्या वेळी मला उंडाळकरांनी साथ केली. त्यामुळे ते तत्त्वाच्या लढाईसाठी साथ देणारे व्यक्तिमत्त्व आहे. मी मुख्यमंत्री असतना काकांना (उंडाळकर) मंत्रिमंडळामध्ये घेतले. सहकार खाते त्यांच्याकडे होते. त्यांना कधी एखादी गोष्ट पटली नाही तर ते बैठकीतून निघून जायचे. असे करारी आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून मला ते भावले.'' 

""एखादी लष्करी कारवाई करून त्याचा सध्या गाजावाजा केला जात आहे. कॉंग्रेसच्या सत्तेच्या काळात आम्ही अनेक सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र, गोपनीयतेमुळे आम्ही गाजावाजा केला नाही. सध्या मात्र त्याचा गाजावाजा सुरू आहे. दर तीन वेळेस अशी सरकारे आली. ती सर्व पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आहेत. हा इतिहास पुढे घडेल आणि या मतलबी सरकारची भूमिका लवकरच संपेल,'' असेही श्री. शिंदे यांनी नमूद केले. 

उल्हास पवार म्हणाले, ""उंडाळकर काका स्पष्ट वक्‍ते आहेत. सोनिया गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत त्यांची निष्ठा होती.'' 

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ""येथे जमलेली गर्दी पाहता काका हे शेतकऱ्यांचे पुढारी आहेत, हे स्पष्ट होते. ते आजपर्यत जिंकले ते कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे. ज्या ज्या वेळी आंदोलने केली त्या वेळी काकांनी आमची बाजू घेतली. "अच्छे दिन'ऐवजी फॅसिजम हुकूमशाही आली आहे. त्यांना हरवण्यासाठीचे रणशिंग आपण आज इथून फुंकले आहे.'' 

श्री. उंडाळकर म्हणाले, ""माझ्या इतका समाधानी लोकप्रतिनिधी महाराष्ट्रात नाही. खिश्‍यात पैसा नाही, पेन नाही, साधा मोबाईल नाही, तरीही जनता माझ्यावर प्रेम करते. हो, मी फटकळ आहे, मात्र तळहाताच्या फोडाप्रमाणे कार्यकर्ते सांभाळले आहेत. आजच्या पुढाऱ्यांना कोणती वाडी कुठे आहे, हे सांगता येणार नाही. आज संक्रमणाचा काळ आहे. थोडे थांबा, परिस्थिती बदलणार आहे. भर उन्हातही तुम्ही जमला आहात, सत्तेत नसलेल्या कार्यकर्त्यालाही एवढी गर्दी जमावने कठीण आहे. गाड्या लावून आणलेली ही माणसे नाहीत. स्वखर्चाने कार्यक्रमाला येऊन तुम्ही मला जो पाठिंबा दिला, तो शब्दांत व्यक्त करता येत नाही. स्वातंत्र्यसैनिक दादा उंडाळकर यांचे विचार, माझ्या नसा नसात भिनलेले आहेत. त्यापासून मी फारकत घेऊ शकत नाही. जीवनमूल्ये आणि विचारधारा बाजारात मिळत नाही. एक छदामही न घेता, सात वेळा या जनतेने मला निवडून दिले. हा मोठा विक्रम आहे.'' 

डॉ. मुळीक, श्री. केतकर, महाराव, विनोद शिरसाट यांनी मनगोत व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. धनाजी काटकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. उदयसिंह पाटील यांनी आभार मानले. 

आम्हाला निष्ठा शिकवू नका 
विलासराव उंडाळकर यांनी सत्काराला उत्तर देताना पक्षाशी संबंधित त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, ""विधान परिषदेची निवडणूक लागली होती. त्यादरम्यान माझ्या पत्नीचे निधन झाले. त्या वेळी मला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोन आला. तुम्हाला मतदानासाठी यावे लागेल. त्यांनी जयवंतराव आवळेंना माझ्याकडे पाठवले. ज्यादिवशी रक्षाविसर्जन होते, त्यादिवशी मतदान होते. रक्षाविसर्जन करून कशाचाही विचार न करता मी पक्षासाठी मुंबईला मतदानासाठी गेलो. त्यामुळे सध्याच्या नेत्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये.'' 

काका, आता कॉंग्रेसमध्ये या 
जयवंतराव आवळे म्हणाले, ""सात वेळा आमदार असतानाही विलासकाकांवर कॉंग्रेस पक्षाने अन्याय केला. काकांवर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे. उंडाळकर तुम्ही आता वस्ताद आहात. या मतदारसंघात तुम्हाला जोड नाही. विलासकाका पुढील निवडणुकीत नक्कीच आमदार होतील. त्यांनी कधीच संसार बघितला नाही. अनेकांनी अनेक साखर कारखाने काढले. मात्र, काकांनी कार्यकर्ते निर्माण करण्याचा कारखाना काढला. त्यांचे चारित्र्य आणि स्वच्छ हात आहेत. येणारी निवडणूक काका आता तुम्ही कॉंग्रेसमध्ये या. आजच शिंदे साहेबांनी त्यांना हार घालून त्यांना कॉंग्रेसमध्ये घ्यावे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com