‘कर्नाटक’चा सोलापूरच्या पाण्यावर डल्ला! औज, चिंचपूर बंधाऱ्यात ५ पंप; इंडीसह ९ लघू प्रकल्पांत साठवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aauj bandhara
‘कर्नाटक’चा सोलापूरच्या पाण्यावर डल्ला! औज, चिंचपूर बंधाऱ्यात ५ पंप; इंडीसह ९ लघू प्रकल्पांत साठवण

‘कर्नाटक’चा सोलापूरच्या पाण्यावर डल्ला! औज, चिंचपूर बंधाऱ्यात ५ पंप; इंडीसह ९ लघू प्रकल्पांत साठवण

सोलापूर : महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर आपला हक्क दाखविणाऱ्या कर्नाटकने सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यातून पाच पंप लावून पाणी उपसा सुरु केला आहे. त्यातून इंडी तालुक्यातील नऊ लघू प्रकल्प भरून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन राज्यांचा विषय असल्याने ‘जलसंपदा’च्या अधिकांऱ्यांनी त्यासंबंधीचा अहवाल मुख्य अभियंत्यांना पाठविला आहे.

सोलापूर शहराला सध्या ४५ वर्षांपूर्वीच्या जुन्या पाइपलाइनमधून पाणी पुरवठा केला जातो. स्मार्टसिटी व एनटीपीसीच्या माध्यमातून सोलापूर ते उजनी अशी १२० किलोमीटरची समांतर जलवाहिनी मंजूर आहे. दहा-पंधरा किलोमीटर काम देखील झाले. त्यानंतर मागील साडेतीन वर्षात एक फूटदेखील काम पुढे झाले नाही. मक्तेदार बदल, ११० एमएलडीवर आता १७० एमएलडी क्षमता करणे, अशा बाबींमध्ये खूपच वेळ गेला.

अधिकारी व पदाधिकाऱ्यांमधील असमन्वय व ढिसाळ नियोजनामुळेच तसा प्रकार झाला. त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाते. ते पाणी चिंचपूरमधून औज बंधाऱ्यात येते. पंपहाऊसद्वारे तेथून ते पाणी सोलापूर शहराला पुरवले जाते. मात्र, राज्याच्या सीमेवरील कर्नाटकने औज व चिंचपूर बंधाऱ्यात चोरीच्या मार्गाने पाणी उपसा करण्यासाठी पाच पंप टाकले आहेत. त्याठिकाणी कोणाचेही लक्ष नसल्याने कर्नाटककडून औज व चिंचपूर बंधाऱ्यातून रात्रंदिवस बिनधास्तपणे पाणी उपसा सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, भीमा कालवा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यावेळी ती बाब खरी असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यासंबंधीचा अहवाल जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पाठविला असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनाही तो दिला जाणार आहे.

‘जलसंपदा’च्या अहवालातील नोंदी

  • औज बंधाऱ्यावरून मरगूर (ता. इंडी) येथील जॅकवेलमधून कर्नाटककडून पाणी उपसा

  • औज बंधाऱ्यातील पाणी उपसा करण्यासाठी कर्नाटकने टाकले ५७० ‘एचपी’चे तीन पंप

  • इंडीजवळील चिंचपूर बंधाऱ्यात कर्नाटकने टाकले ३७० ‘एचपी’चे दोन पंप

  • चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्यावर कर्नाटकने उभारली इंडीची पाणीपुरवठा व्यवस्था

  • औज बंधाऱ्यातून अवैधरीत्या उपसलेल्या पाण्यातून इंडीतील नऊ तलाव भरून घेतले जातात

अधिकाऱ्यांचे वराती मागून घोडे...

समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर दररोज १७० एमएलडी पाणी उजनीतून सोलापूर शहरासाठी येईल. त्यावेळी शहरासाठी भीमा नदीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडणे बंद केले जाणार आहे. पण, समांतर जलवाहिनीचा मक्तेदार बदलूनही काम जागेवरच थांबले आहे. दुसरीकडे सोलापूरकरांना चार-पाच दिवसाआड पाणी मिळत असल्याची वस्तुस्थिती असतानाही तिकडे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यातून बेकायदेशीरपणे लाखो लिटर पाणी कर्नाटक दररोज उपसा करत आहे. एवढे दिवस संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब समजली कशी नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.