राज्यात शिवसेना उट्टे काढणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

कर्नाटक कॉंग्रेसने जिंकले, तर भाजप विरोधकांची धार तेज

कर्नाटक कॉंग्रेसने जिंकले, तर भाजप विरोधकांची धार तेज
मुंबई - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे सर्वच राजकीय पक्षाला वेध लागले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत दमछाक झालेल्या भाजपला जिंकण्याची आशा लागली असली, तरी या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष जिंकला, तर देशपातळीवर भाजप विरोधकांची धार अधिक तेज होणार आहे. तर शिवसेना राज्यात भाजपचे चांगलेच उट्टे काढणार असल्याचा तर्क लढविला जात आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक ही 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या रंगीत तालमीची सुरवात मानली जाते. बहुतांश पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्याने भाजप विरोधातील पक्षांना आत्मविश्‍वास आला आहे. कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयाने विरोधी पक्षांच्या या आत्मविश्‍वासाला चांगलेच बळ प्राप्त होणार आहे. यामुळे भाजपला केंद्रस्तरावर बॅकफूटला जावे लागेल, तर कॉंग्रेसने सत्ता राखून दमदार पाऊल टाकल्याचे सिद्ध होईल.

या निकालाने राज्यातील राजकारणाची दिशादेखील आणखी स्पष्ट होण्यास मदत होणार असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीत यश मिळाले, तर शिवसेना भाजपच्या विरोधात आणखी आक्रमक होणार असल्याची चिन्हे आहेत. कारण सत्तेतील शिवसेनेला भाजपने मागील चार वर्षांत दुय्यम खाती देऊन बोळवण केल्याची खंत शिवसेनेला आहे. शिवसेनेने भविष्यातील कोणतीही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही भाजपला शिवसेना फटकून वागेल, असे वाटत नाही. हिंदुत्ववादी मतांची फूट पडू द्यायची नाही, ही शक्‍कल भाजपने शिवसेनेपुढे मांडली आहे.

कर्नाटकमधील कॉंग्रेस पक्षाच्या विजयाने शिवसेनेला आणखी बळ मिळणार आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधातील मोहीम आणखी तीव्र होईल, असे मत राजकीय जाणकार व्यक्‍त करीत आहेत.

Web Title: karnataka vidhansabha election shivsena politics congress BJP