कारवी बहर: सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान
कारवी बहर: सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान

कारवी बहर: सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान

कारवी!! सह्याद्रीत तंगडतोड करणाऱ्यांना हा काही नवखा शब्द नाही. डोंगर उतारांवर वाढणारी ही झुडूप वजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदानच म्हणायला हवे. सात-आठ वर्षे उंच उंच वाढणारी ही झुडपे अशी काही दाट जाळी निर्माण करतात, की भरउन्हाळ्यातही या जाळीच्या छायेतून फिरताना उन्हाचा दाह जाणवू नये. एवढेच काय तर डोंगर उतारावरून मुरमाड मातीतून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी मदतीचा हात पुढे करत उभी असतात ती हीच कारवीची झाडे. कारवीची मुळे जमिनीत अशी काही जाळी गुंफतात, की वाऱ्या-पावसामुळे होणारी जमिनीची धूप आटोक्‍यात येते. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळे पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्थर वाढवण्यास हातभार लावतात. याच कारवीच्या दाट जाळीच्या आश्रयाला वाढतात अनेक ऑर्किड (ground orchids) आणि लिली (lilies) ज्याचे गुरांपासून संरक्षण करते ही करावी. कारवीची पाने जनावरांच्या चाऱ्यास उपयोगी पडतात. तर अनेक कीटकांना खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते ते याच कारवीच्या झुडपांवर. या कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचे (mass flowering) एकत्रित बहर, सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा.

ही झाडे सलग सात वर्षे वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोरी फुले लेऊन जेव्हा ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा डोंगर उतारांना त्या रंगाच्या छटा प्राप्त होतात. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्‍या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच डेरा देऊन बसतात. महाबळेश्वर भागात आदिवासी लोक हा कारवीचा मध गोळा करतात. अधिक दाट आणि गडद रंगाच्या या मधाची बाजारात चढ्या भावाने विक्री होते. कारवीच्या आश्रयाला वाढणारे अनेक कीटक जंगलातील इतर वृक्षांच्या (pollination) परागीभवना/ परागीकरणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत असल्यामुळे कारवी जंगल संवर्धनास अप्रत्यक्षरीत्या का होईना; पण मोलाचा हातभार लावते. बहर ओसरला, की कारवीची बोंडे सुकू लागतात. या बोंडांवर तरळणारा चिकट तरल द्रव चाखायला गुरांना आवडते. बोंडामधील बिया पक्व झाल्या, की जीवन चक्रातील महत्त्वाची म्हणजेच प्रजननची आपली जबाबदारी पूर्ण केलेली ही झाडे आठ वर्षांची तपश्‍चर्या पूर्ण करून कृतज्ञतेने आपला जीवनकाळ संपवतात. जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरीच्या माऱ्याने ही बोंडे तड तड आवाज करत फुटतात आणि त्या झटक्‍याने आतील बिया दूरवर भिरकावल्या जातात. कारवीच्या (mass flowering) एकत्रित बहरचा मुख्य हेतू बिया खाणाऱ्या कीटकांपासून बियांचे संरक्षण. (mass flowering) एकत्रित बहरामध्ये इतक्‍या बिया विखुरल्या जातात, की भलेही काही बिया कीटकांच्या भक्ष्यस्थानी पडल्या, तरी नव्या फुटीसाठी मुबलक बिया शिल्लक राहतात. हाच फंडा नैसर्गिक आपत्ती जसे दुष्काळ, वणवा यामुळे होणाऱ्या नुकासानालाही लागू पडतो. कारवीच्या उंचच उंच सरळसोट वाढणाऱ्या काड्यांचा वापर कुडाचे घर बांधण्यासाठी करतात. एवढेच काय तर कारवीच्या मुळांवर काही परजीवी वनस्पतीदेखील वाढतात. अशा या बहुपयोगी कारवीचा दर आठ वर्षांनी सह्याद्रीत फुलणारा असा हा आगळावेगळा पुष्पोत्सव मन भरून पाहण्याची माझी अनेक वर्षांपासूनची तीव्र इच्छा या वर्षी पूर्ण झाली.


एक ते चौदा वर्षे अंतराने फुलणाऱ्या कारवीच्या अनेक जाती आहेत. त्यातल्या त्यात डोंगर भटक्‍यांच्या परिचयाच्या दोन जाती म्हणजे तीव्र उताराच्या डोंगरावर उंच वाढणारी कारवी (strobilanthes callosus) आणि टेकडी अथवा पठारावर वाढणारी तुलनेने खुजी (strobilanthes sessilis) म्हणजेच "टोपली' कारवी. कारवी मावळात, माळशेज घाटात, भंडारदरा तसेच त्र्यंबक परिसरात मुबलक पाहायला मिळते, तर टोपली कारवी कास, चाळकेवाडी पठार, अंबोली, राधानगरी या परिसरांत मोठ्या प्रमाणात उगवते. 2008 साली झालेले कारवीचे (mass flowering) जरी मी पहिले असले, तरी त्या वेळी कारवीच्या या बहुपयोगी गुणधर्मांबद्दल असलेल्या अनभिज्ञतेमुळे या पुष्पोत्सावाचा मनमुराद आनंद लुटता आला नव्हता. गेल्या वर्षी पावसाची नाराजी झाल्यामुळे कारवी तुरळकच फुलली. तरी त्र्यंबक परिसरात बऱ्यापैकी बहर पाहायला मिळाला होता. कर्नाटकात नीलकुरींजी नामक झुडपाचा दर बारा वर्षांनी फुलणारा बहर जसा डोंगर रांगांना जांभळ्या छटात रंगून देतो, तसे दृश्‍य महाराष्ट्रात पाहायची मनीषा फार वर्षांपासून मनात उचंबळत होती. यंदा सप्टेंबरमध्ये खुटे घाट चढाईदरम्यान कारवीचा उमदा बहर अनुभवला होता. (mass flowering) एकत्रित बहर म्हणजे नेमके काय, याचा थोडक्‍यात प्रत्यय या ट्रेकदरम्यान आला. पायवाटेच्या दुतर्फा पाच ते आठ फूट उंच वाढलेली कारवीची झाडे जांभळ्या टपोऱ्या फुलांनी लगडली होती. पायाखाली गळून पडलेल्या फुलांनी जणू जांभळा गालिचाच अंथरला होता. नजर जाईल तेथे जांभळे कोंदण. कारवीच्या बहराचे सौदर्य शब्दांत मांडता येणे कठीणच; ते प्रत्यक्ष अनुभवायला हवे. यानंतर चांदोली अभयारण्यातील सड्यांच्या सफरीदरम्यानही असेच कारवीचे बहर पाहायला मिळाले; पण मनाला आस लागलेली ती संपूर्ण डोंगराला जांभळ्या रंगात रंगून देणारे बहर पाहण्याची. पुढे कामाच्या गडबडीत जाणे झालेच नाही. याही वर्षी ही इच्छा अपूर्णच राहतेय की काय, असा प्रश्न मनाला भेडसावत असतानाच एका व्हॉट्‌सऍपच्या ग्रुपवर करमवीरभाई यांनी शेअर केलेले काही फोटो पहिले. धुक्‍याशी लपंडाव खेळणारा डोंगर संपूर्ण जांभळ्या रंगात न्हाऊन निघालेला दिसत होता. हेच ते दृश्‍य, जे याची देही याची डोळा पाहण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून बसलेय मी गेली कित्येक वर्षे. पण नेमके कधी फुलावे कारवीने? गाठीशी महिनाभराच्या सुट्या असूनही exam duty असल्यामुळे सुटी घेणे शक्‍य नव्हते. म्हणजेच हा बहर पाहायला आणखी निदान आठवडाभर तरी वाट पाहावी लागणार होती. कारवीचा बहर तसा दोन-तीन आठवडे टिकतो; तरी ऊन वाढू लागले, की फुले करपून जातात आणि बहर ओसरू लागतो.

आता / यंदा हा बहर फुलला होता ते बागलाणातल्या साल्हेर गडावर. एव्हाना सप्टेंबर संपून ऑक्‍टोबर हीट सुरू झालेली. त्यात बागलाणातून पंधरवड्यापूर्वीच पावसाने काढता पाय घेतलेला. दिवसागणिक बहर ओसरत जाणार या चिंतेने मन खट्टू होत होते. देवा या वर्षी तरी मला हा बहर पाहण्याचे भाग्य लाभूदे अशा विनवण्या करत कस-बसा आठवडा ढकलला. कामे आटोपता आटोपता ऑफिसमधे बराच उशीर झालेला. घरी येऊन कसे-बसे समान आवरले आणि एकदाचे नाशिककडे गाडी पिटाळली. आख्खी रात्र प्रवास करून पहाटे साल्हेर वाडीत पोचलो. गेल्या आठवडाभर कामासाठी झालेली धावपळ आणि रात्रीच्या प्रवासाचा शीण घालवण्यासाठी निदान तास-दोन तासांची शांत झोप आवश्‍यक होती. दोन तास झोप काढून आणि नाश्‍ता उरकून गड चढाईला सुरवात केली, तेव्हा दुपारचे एक वाजले होते. ऑक्‍टोबर महिना असल्याने डोक्‍यावर सूर्य जणू आग ओकत होता. आठवड्याचे व्यग्र शेड्यूल, अपुरी झोप आणि त्यात हा उष्मा जीव काढत होता. आमच्यासोबत फोटोग्राफर मंडळी असल्यामुळे वळणावळणावर कॅमेरे रोखले जात होते. त्यामुळे जवळ जवळ सरपटत म्हणता येईल इतक्‍या संथगतीने आम्ही किल्ला चढत होतो. एवढ्या उष्म्यात कारवीचा बहर शिल्लक असण्याच्या उरल्या सुरल्या आशा आता लोप पावू लागल्या होत्या.

तासाभरात पहिला दरवाजा ओलांडून माचीवर दाखल झालो. नवरात्र उलटून गेल्यावर सह्याद्रीत सगळीकडेच गवत उंचच उंच वाढू लागते. माचीवरही गवत चांगले कंबरभर उंच वाढले होते. पुढे पायवाटेच्या दुतर्फा रानाचा ताबा कारवीने घेतला. गळून गेलेली फुले, सुकलेल्या गळून पडलेल्या फुलांचा खच आणि हिरवीगार कारवी पाहून पुरता हिरमूस झाला. उशीरच झाला यायला. राहून राहून वाटत होते की मागच्या आठवड्यात येथे येणे व्हायला हवे होते. थोड्या दीडमूड अवस्थेतच पायऱ्या चढून पठारावर दाखल झालो. पठारावर शेवटच्या दरवाजासमोरच कारवीचा एक ताटवा टवटवीत फुले लेऊन वाऱ्यासंगे खुशाल डोलत होता. त्याच्या दर्शनाने जिवात जीव आला. त्या फुलांना पाहून सहज विचार आला लेकांनो... निदान तुम्ही तरी वाट पहिलीत आमची... शतशः धन्यवाद... दरवाजाच्या कमानीवरील टेहळणी बुरुजावर पोचून मागून येणाऱ्या राजस आणि सारंग यांना हाक मारली आणि मागे वळले. आता पहिल्यांदाच गड माथ्याकडे नजर गेली होती. समोर जे दृश्‍य दिसत होते त्यावर क्षणभर विश्वासच बसत नव्हता. हाच तो जांभळा पुष्पोत्सव. हीच ती रंगाची उधळण जी पाहण्याची मनीषा मला इथवर घेऊन आली होती.

हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवरचे फोटो आपण नेहेमीच पाहत असतो. सड्यावरील रानफुलांचे रंगीत गालिचे पाहतो, पण कारवीचा हा असा बहर हा एक आगळावेगळा अनुभव होता. पठारापासून सुरू झालेला हा जांभळा सडा, संपूर्ण डोंगर उतार व्यापून परशुरामाचे मंदिर असलेले शिखर चढून थेट परशुरामाच्या पादुकांपर्यंत पोचला होता. कोणीतरी अखंड डोंगर उताराला जांभळ्या-हिरव्या रंगांच्या नाजूक नक्षीदार शालीत लापेटल्यासारखे भासत होते. हा संपूर्ण नजारा निव्वळ शब्दातीत होता. आम्ही चौघेही जण स्थंभित होऊन कितीतरी वेळ डोंगराकडे नुसते पाहत उभे होतो.

मागे एकदा एका लेखासाठी कारवीच्या बहरातून जाणाऱ्या पायवाटेचे फोटो आहेत का, अशी विचारणा झाली होती. आज येथे असे शेकडो फोटो टिपता येणार होते. गुडघाभर उंची गाठलेल्या टोपली कारवीने अंतरा अंतरावर दाट जाळी गुंफत संपूर्ण पठार, डोंगर उतार आणि गडमाथ्याचा ताबा घेतला होता. बऱ्यापैकी उंची गाठल्याने पाऊस नसला तरी येथे धुके सांदळून अद्याप बराच ओलावा शिल्लक होता. माचीच्या तुलनेत येथील बहर अजून शाबूत असण्याचे बहुदा हेच कारण असावे. पायवाटेच्या दुतर्फा कारवीची गच्च जाळी पसरली होती. दोन अडीच फूट सरळसोट वाढलेल्या कारवीच्या दांड्यांवर फूट फूट उंचीचा चौफेर फुलोरा बहरला होता. झुडपाच्या तळाशी गळून पडलेल्या फुलांचा खच पडला होता. वाऱ्यासवे डोलणारा हा जांभळा रंग आपल्या जिवंतपणाची जणू ग्वाही देत होता. कारवीच्या जाळीतून जेव्हा चालू लागलो तेव्हा फुलांवर घुटमळणाऱ्या असंख्य मधमाश्‍यांचा घूं... घूं... आवाज कानात घुमू लागला. आयताकृती टाक्‍याच्या वरच्या बाजूला फुललेल्या कारवीचे पाण्यावर हेलकावणारे प्रतिबिंब पाहण्याचा आनंद काही औरच होता. यज्ञवेदी ओलांडून आम्ही गुहेपाशी पोचलो. गुहेशेजारी कारवीच्या जाळीत दडून बसलेल्या रातकिड्यांच्या टोळक्‍यांची एकमेकांशी जुगलबंदी सुरू होती. त्या निस्सीम शांततेत त्यांचा तो तालबद्द किरकिराटही कानांना गोड भासत होता. गुहेपासून गडमाथ्याकडे कूच केले. जसजसे वर चढत होतो, तसतसे कारवीच्या फुलांचा तजेला वाढत जात होता. फुलांवर सांदळलेले दव जणू फुलांच्या तजेल्याचे रहस्य उलगडून सांगत होते. निसर्गाच्या रंगमंचावर कारवीच्या बहराने मांडलेला हा पुष्पोत्सव इथे पार टिपेला पोचला होता आणि या अद्भुत सोहळ्याचे रसिक साक्षीदार आम्ही पार मंत्रमुग्ध होऊन या जांभळ्या रंगोत्सवाचा भान हरपून आस्वाद घेत होतो.

जांभळ्या जाळीतून नागमोडी वळणे घेत जाणारी पायवाट थेट गड शिखरावरील परशुराम मंदिरापर्यंत पोचली होती. टेकडीवरील जांभळ्या जाळीत लक्ष वेधून घेतले ते आपले वेगळेपण मिरवत डौलात डोलणाऱ्या एकुलत्या एक पांढऱ्या कारवीच्या झुडपाने. सूर्यनारायणाच्या ढगांशी चालेल्या लपंडावामुळे कभी धूप कभी छाव अनुभवायला मिळत होती. दुपारची न्याहारी आटोपून आम्ही अंग बधीर करणाऱ्या गार वाऱ्याचा कौल घेतला आणि मंदिरासमोरच्या चौथऱ्यावर अंग झोकून दिले. तास दीड तास कसा ओसरला कळलेच नाही. खडबडून जागे झालो. आम्ही उठून सामान आवरले तेव्हढ्यात साटाण्याहून आलेले तीन गिर्यारोहक मंदिराशी पोचले. त्यांच्याशी चार गोष्टी बोलून आम्ही उतरायला सुरवात केली.

उन्हे कलायला लागल्यामुळे तिरपी पडणारी सूर्यकिरणे कारवीच्या जांभळ्या रंगला जणू सुवर्ण मुलामा देत होती. या सोनपिवळ्या उन्हात कारवी अधिकच खुलून दिसत होती. गडमाथा उतरून आम्ही गंगासागर तलावापाशी आलो. रेणुकाआईचे दर्शन घेऊन आम्ही तलावाच्या पलीकडे पोचलो. तलावाच्या स्थिर पाण्यावर डोंगराचे अखंड जांभळे प्रतिबिंब तरंगत होते. इतर मंडळी मावळतीच्या उजेडात जमेल तितक्‍या रंगछटा केमेऱ्यात टिपण्यात गढून गेलेली; तर मी तेथेच तलावाच्या कट्ट्यावर बसून हा अनोखा निसर्ग चमत्कार डोळ्यांत साठवून घेण्याचा प्रयत्न करत होते. समोरच्या आडव्या पसरलेल्या जांभळ्या जाळीत मला ओळखीचे स्मितहास्य उमटल्याचा उगाचच भास होत होता. जणू हा सह्याद्री मला सांगत होता, की हो मी तुझीच वाट पाहत होतो.

अखेर सूर्यराव क्षितिजापलीकडे पसार झाले आणि अंधारू लागले तसे आम्ही गड उतरू लागलो. पठारावरून गडाचा निरोप घेताना पाय अडखळत होते, मनोमन सह्याद्रीला दंडवत घालून त्याचे शतशः आभार मानले. आजचा अनुभव जे काही समाधान देऊन गेला होता, ते शब्दांत व्यक्त करता येत नव्हते. खूप वर्षांपासून मनात घर करून बसलेली एक सुप्त इच्छा आज पूर्ण झाली होती. किंबहुना अपेक्षेपेक्षा बरेच अधिक काही गवसले होते.

पुढच्या आठ वर्षांत माझ्या आयुष्यात आणि येथील पर्यावरणात काय काय बदल घडतील काही सांगता येणार नाही. त्यामुळे या वर्षी हे निसर्गवैभव मनसोक्त अनुभवता आले, हीच या वर्षीची मिळकत म्हणायची. हा अनुभव आयुष्यभारासाठी पुरणार आहे, यात शंकाच नाही. सह्याद्रीतील प्रत्येक सच्च्या भटक्‍याला आयुष्यात निदान एकदा तरी सह्याद्रीचे हे असे गोंडस रूप अनुभवता यावे, हीच सह्याद्रीचरणी प्रार्थना!!

('साप्ताहिक सकाळ'च्या 26 नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com