केरळमधील आपत्तीमुळे मसाल्यांच्या दरवाढीचा ठसका! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नवी मुंबई : चटपटीत जेवण म्हटले की मसाला आवश्‍यकच असतो. मात्र, काही दिवसांतच या मसाल्यांच्या दरवाढीचा ठसका सर्वसामान्यांना लागणार आहे. केरळमधील महापुरामुळे तेथील मसाल्यांच्या शेतीला मोठा फटका बसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील आवक तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. त्यामुळे मसाल्यांच्या पदार्थांचे दर वाढणार, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली. 

नवी मुंबई : चटपटीत जेवण म्हटले की मसाला आवश्‍यकच असतो. मात्र, काही दिवसांतच या मसाल्यांच्या दरवाढीचा ठसका सर्वसामान्यांना लागणार आहे. केरळमधील महापुरामुळे तेथील मसाल्यांच्या शेतीला मोठा फटका बसल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला मार्केटमधील आवक तब्बल 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. त्यामुळे मसाल्यांच्या पदार्थांचे दर वाढणार, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली. 

केरळमधून महाराष्ट्राला काळी मिरी, वेलची, तेजपत्ता, जायफळ, लवंग, आद्रक, जावंती आणि दालचिनी आदी मसाल्यातील प्रमुख पदार्थांचा पुरवठा होतो. केरळमधील विविध भागांमध्ये डोंगराळ भागातील उतारावरील जमिनी आणि घनदाट जंगलात मसालेयुक्त पदार्थांची लागवड केली जाते; मात्र महापुराच्या तडाख्यामुळे भूस्खलन झाल्याने उतारावरील मसाल्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशीतील मसाला मार्केटमध्ये महिन्याला सुमारे 70 ते 75 वाहनांमधून मसाल्याच्या पदार्थांची आवक होत असते; मात्र केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे मसाल्यांची आवक 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. 

अतिवृष्टीवेळी शेतातून काढून गोदामांमध्ये काही ठिकाणी मसाल्याचे पदार्थ सुरक्षित ठेवण्यात आले होते. महापुराच्या तडाख्यातून बचावलेल्या गोदामांमधील मसाल्याच्या पदार्थांचा सध्या महाराष्ट्रासह देशभर पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अचानक मसाला मार्केटमध्ये पदार्थांची कमतरता भासल्याने मसाले आणि मसालेजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ होण्याची शक्‍यता मसाला व्यापारी कीर्ती राणा यांनी वर्तवली. केरळमधील मसाल्याच्या पदार्थांची आवक कमी झाल्याने तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशहून अतिरिक्त मालाची मागणी नवी मुंबईतील व्यापाऱ्यांनी केली आहे; मात्र मुख्य मसाले केरळमधून येत असल्याने इतर राज्यांतून भार कमी करण्याचा व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे. 
 
बजेटचं "खोबरं' 
सुक्‍या खोबऱ्यासाठी तमिळनाडू, कर्नाटक, कोकणसह केरळही अग्रेसर आहे; मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे केरळमधील नारळाची झाडे उन्मळून पडल्याने एपीएमसी मार्केटमधील खोबऱ्याची आवकही कमी होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे मसाल्यांच्या दरवाढीसह काही दिवसांत सुके खोबरेही महागण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली. 

केरळमधील नैसर्गिक आपत्तीमुळे मसाल्यांची आवक लांबली आहे. तसेच जे पदार्थ केरळमधून पाठवण्यात आले आहेत, त्यांची आवक 50 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. 
- कीर्ती राणा, मसाला व्यापारी, एपीएमसी 

Web Title: Kerala's disaster caused spice prices to rise