खडसेंचे मंत्रिमंडळातील "कमबॅक' निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 सप्टेंबर 2016

जळगाव - खडसेंवर अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांची भावना स्वाभाविक आहे, असे स्पष्ट करतानाच जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी होऊन त्यातून ते निर्दोष सुटतील आणि त्यांचे मंत्रिमंडळात पुन्हा "कमबॅक‘ होईल, असा विश्‍वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. विद्यापीठ कायद्यातील बदलाचे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर करून पुढील शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयीन निवडणुका घेण्यात येतील, असेही ते म्हणाले. 

एका कार्यक्रमानिमित्त तावडे जळगावी आले होते. डॉ. गुरुमुख जगवानी यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी "सकाळ‘शी चर्चा केली. खडसेंबाबत छेडले असता तावडे म्हणाले, दाऊदशी संभाषणाचा व गजानन पाटीलच्या लाचप्रकरणाचा मुद्दा निकाली निघाला आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यात पदाच्या गैरवापराच्या मुद्याची चौकशी केली जाईल. या प्रकरणातूनही खडसे बाहेर येतील व त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा विश्‍वास तावडेंनी व्यक्त केला. विद्यापीठ कायद्यातील बदलासंदर्भात विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे, त्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी केली जाईल. विद्यार्थी संघटनांकडून महाविद्यालयीन निवडणुकांची मागणी होत आहे. या कायद्याद्वारे विद्यापीठांना तो अधिकार देऊन पुढील शैक्षणिक वर्षापासून या निवडणुका नियमितपणे घेण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. 

"त्या‘ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणारच 

बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी जागांअभावी प्रवेशापासून वंचित राहत असल्याबाबत विचारले असता श्री. तावडे म्हणाले, काही विद्यार्थ्यांचा ठराविकच महाविद्यालय मिळावे असा आग्रह आहे, तसे शक्‍य नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तीस किलोमीटर कार्यक्षेत्रातील महाविद्यालय स्वीकारावे लागेल, त्यात प्रवेश घेता येईल. तरीही, ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, त्यांच्यासाठी जागा वाढविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Khadase cabinet "go with a roar 'fixed