खादी ग्रामोद्योगच्या कर्मचाऱ्यांना नोटीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जानेवारी 2017

शिवसेनेच्या हाती कोलित, सोशल मीडियावर पोस्ट

शिवसेनेच्या हाती कोलित, सोशल मीडियावर पोस्ट
मुंबई - खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडर आणि डायरीवरील महात्मा गांधी यांच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापल्यानंतर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची "मातोश्री'ने गंभीर दखल घेतली असून, शिवसेना नेते पुढील दिशा ठरविणार आहेत. तसेच महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण तापणार असल्याने भाजपवर टीकास्त्र सोडण्याचे कोलित शिवसेनेच्या हातात आयतेच सापडले आहे. याची झलक सोशल मीडियातून आज दिसली.

खादी ग्रामोद्योग आयोगाकडून दरवर्षी कॅलेंडर आणि डायरी छापण्यात येते. यावर वर्षानुवर्षे महात्मा गांधी यांची प्रतिमा छापण्याची परंपरा आहे; मात्र यंदाच्या कॅलेंडर व डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा छापल्यावर देशभरात गदारोळ उडाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आयोगातील "खादी ग्रामोद्योग कर्मचारी सेना' या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मुख्यालयासमोर 12 जानेवारी रोजी आंदोलन केले होते. या प्रकरणाचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. गेल्या आठवड्यातील या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर खादी ग्रामोद्योग आयोगाच्या प्रशासनाने कर्मचारी संघटनेला नोटीस बजावली आहे. या नोटिशीमध्ये प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्याने कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाच्या नोटिशीमुळे कर्मचारी पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, येत्या प्रजासत्ताकदिनी कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

प्रशासनाने बजावलेल्या नोटिशीची गंभीर दखल "मातोश्री'ने घेतली असून, या संदर्भात उशिरापर्यंत बड्या नेत्यांची चर्चा सुरू होती. याबाबत येत्या दोन दिवसांत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेने विरोधाची भूमिका अद्यापपर्यंत कायम ठेवली असताना शिवसेनेच्या हातात आता आणखी मुद्दा सापडला आहे. निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेकडून या मुद्द्याचा खुबीने वापर करण्यासाठी शिवसेना नेते सरसावले आहेत. याची झलक सोशल मीडियातून आज झळकली असून, "जुलमी राजवटीचा अतिरेक...!', "लोकशाही गेली, मोदीशाही आली!' "आपण इंग्रजांसारख्या परकीय शत्रूच्या हातात सत्ता दिली आहे, की स्वकीयांच्याच आहे हे सरकार?' अशा पोस्ट शिवसेनेकडून टाकण्यात आल्या आहेत.

Web Title: Khadi and Village Industries employees notice