'खांदेरी'ने वाढणार नौदलाची ताकद...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - फ्रान्सच्या सहकार्याने येथील माझगाव गोदीत सुरू असलेल्या "स्कॉर्पिन' पाणबुड्या बांधणीच्या प्रकल्पातील "खांदेरी' या दुसऱ्या स्वदेशी पाणबुडीचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत आज जलावतरण करण्यात आले. या अत्याधुनिक पाणबुडीमुळे स्वदेशी बनावटीच्या संरक्षण साहित्यात भारताने मोठा टप्पा गाठल्याचे मानते जाते. या पाणबुडीच्या आता चाचण्या होणार असून, या वर्षअखेर ती नौदलात दाखल होण्याची शक्‍यता आहे. नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा या वेळी उपस्थित होते.

'खांदेरी'ची वैशिष्ट्ये
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचे उदाहरण असलेल्या प्रख्यात खांदेरी बेटावरून पाणबुडीचे नामकरण. "टायगर' शार्क माशालाही "खांदेरी' म्हणतात.
- बहुपयोगी पाणबुडी. सागराच्या पृष्ठभागावरून होणारा, पाणबुडीतून होणारा मारा परतवण्याची क्षमता. तसेच सुरुंग पेरणे, टेहळणी करणे, गुप्त माहिती गोळा करण्यासाठीही उपयुक्त.
- शत्रूपासून लपण्याची उच्च क्षमता, अधिक अचूक दिशादर्शक प्रणाली.
- संवाद, दळणवळणसाठी पाणबुडीवर अत्याधुनिक यंत्रणा
- सागराच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून पाणतीरांचा मारा करणे, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता.
- उष्णकटिबंधीयसह कोणत्याही वातावरणात कार्य करण्यास सक्षम.
- नौदलात पहिली पाणबुडी आठ डिसेंबर 1967 रोजी दाखल झाली होती.
- "स्कॉर्पिन' श्रेणीची पहिली पाणबुडी नौदलात सहा डिसेंबर 1986 रोजी दाखल झाली होती. वीस वर्षांच्या सेवेनंतर तिला निरोप देण्यात आला.
- "खांदेरी' या वर्षअखेर नौदलात दाखल होण्याची शक्‍यता.

Web Title: khanderi submarine launched in mumbai