
ज्यांच्यावर चौकशी लावली तेच आमदार भाजपसोबत आले; आता सोमय्या म्हणतात...
मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार असताना शिवसेनेतील बहुतांशी आमदारांवर भाजपकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यापैकी अनेक आमदारांना भाजपनेते किरीट सोमय्या यांनी अक्षरश: 'सळो की पळो' करून सोडले होते. अनेक आमदार आणि खासदारांची 'ईडी'कडून चौकशी सुरू आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांची भूमिका प्रमुख होती. मात्र आता आरोप झालेले आमदारच भाजपसोबत आले आहेत. त्यावर सोमय्या यांना विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळल्याचं पाहायला मिळालं. (kirit somaiya on Shinde-Fadnavis Government)
हेही वाचा: महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, किरीट सोमय्यांचं ट्विट
भाजप आणि शिवेसनेच्या एकनाथ शिंदे गटाने विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. मात्र हे बहुमत सिद्ध करताना सभागृहातील विरोधी आमदारांनी ईडीच्या घोषणा दिल्या होत्या. तसेच हे ईडीचं सरकार असल्याची टीका केली होती. यावर सोमय्या म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या, पत्नीच्या नावे लबाड्या केल्या. तेच लोक हे ईडीचं सरकार असल्याचं म्हणतात. यावेळी सोमय्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. (kirit somaiya on Shinde-Fadnavis Government)
सोमय्या म्हणाले की, मीडियाला केवळ यामिनी जाधव आणि प्रताप सरनाईक हे दोनच नावं सापडतात. तिसरं नाव सांगू शकत नाहीत. ज्यावेळी ४० चोरांचं नाव घेत होतो तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारला होता का, असा सवाल सोमय्या यांनी केला.
हेही वाचा: देवेंद्रजी वेशांतर करून शिंदेंना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट
दरम्यान आम्ही ज्यांच्यावर आरोप केले, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. भावना गवळींवरही कारवाई झाली आहे. आता हे प्रकरणं न्यायालयीन प्रक्रियेत आहेत. आता न्यायालयात काय होणार पाहावं लागेल, असं सोमय्या यांनी म्हटलं. तसेच तुम्ही चौकशीविषयी बोलू नका, उद्धव ठाकरेंचे ४० आमदार निघून गेले त्यावर बोला, असंही सोमय्या यांनी म्हटलं. आधीच्या सरकारचा भ्रष्टाचार होता. आता सरकारचा भ्रष्टाचार नसेल. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे स्वच्छ सरकार देतील, असा दावा सोमय्या यांनी केला.
Web Title: Kirit Somaiya On Shinde Fadnavis Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..