नैनन नीर बहे...

नैनन नीर बहे...

किशोरीताईंनी संगीताचा विचार केवळ शास्त्र, विद्या वा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद असे त्या मानत. तेथपर्यंत आपला संगीतविचार त्यांनी नेऊन ठेवला होता.

आरती अंकलीकर-टिकेकर

एखादी गोष्ट म्हणजे एखाद्याचा श्‍वास असतो, ध्यास असतो; असं मी लहानपणापासून ऐकून होते... पण हे प्रत्यक्षात अनुभवलं ते मात्र ताईंना भेटले तेव्हाच. संगीत, त्याविषयीचे मनन, चिंतन, रियाझ आणि एकूण संगीतच त्यांचा श्‍वास, ध्यास आणि प्राणही होता. आजही ‘सरस्वती’ हा शब्द जरी नुसता उच्चारला ना, तरी माझ्या मनात येते ती प्रतिमा ताईंचीच. त्या रागसंगीताशी अंतर्बाह्य तादात्म्यच पावलेल्या होत्या.
मी ताईंना एक गुरू म्हणून पाहिलं, एक व्यक्ती म्हणूनही खूप जवळून पाहिलं... त्या संगीताच्या क्षेत्रात माझ्या दृष्टीने साक्षात्‌ देवाच्याच जागी होत्या. असंख्यांच्या हृदयावर त्यांनी राज्य केलं. त्यांचं शब्दचित्र रेखाटायचं झालं तर मी त्यांना ‘सात स्वरांच्या घोड्यावर आरूढ असणारी सरस्वती’ असंच म्हणेन! संगीताची असीम साधना करणारी, अखंड चिंतन करणारी अशी व्यक्ती न या आधी झाली, न भविष्यात कधी होईल. किशोरीताईंनी संगीताचा विचार हा केवळ शास्त्र, विद्या किंवा कला एवढ्यापुरताच मर्यादित कधीही ठेवला नाही. याउलट, संगीत म्हणजे अध्यात्म, संगीत म्हणजे आत्मानंद, अशा पातळीवर ताईंनी आपला संगीतविचार नेऊन ठेवला होता. किंबहुना, त्याचं प्रात्यक्षिकच त्यांच्या गायनातून दरवेळी अनुभवायला येत असे.

अगदी मन नेईल तिथे जाणारा गळा त्यांना लाभला होता. पाण्यासारखा वाहता गळा, प्रवाही गळा... त्यांच्या असामान्य प्रतिभेला त्याच तोडीच्या गळ्याची जोड मिळाली. शिवाय, अंगी असणारी अतिशय अभ्यासू वृत्ती. मला आठवतं- ज्या वेळी आम्ही त्यांच्याकडे गाणं शिकायला जात असू, त्या वेळी त्या ‘संगीत रत्नाकर’सारखे कितीतरी जुने ग्रंथ घेऊन बसायच्या. त्यांना नेहमीच संगीताच्या मुळाशी जाऊन भिडण्यात रस होता. त्यांचा संगीतशोध अथकपणे सुरूच असायचा. आपण इतर कुठल्याही गायकाकडून कधीही न ऐकलेल्या असंख्य जागा आपणाला त्यांच्या गळ्यातून ऐकायला मिळायच्या. त्यांच्या गाण्यात कमीतकमी पाच हजार अशी स्वरवाक्‍य निघतील की, जी आजवर कधीही कुणाच्याही गळ्यातून आलेली नाहीत. ना कुणाच्या बुद्धीला अशा स्वरवाक्‍यांचा विचारही कधी स्पर्शिला असेल... मला वाटतं ताईंसारखी विदुषी पुन्हा जन्माला घालणं हे निसर्गापुढेच एक आव्हान असेल.

ताईंना स्वरांपलीकडे जाणारा राग खुणावत असे. स्वरांपलीकडे, आकृतीपलीकडे, शब्दांपलीकडे या ‘पल्याड जाण्याविषयी’ ताईंना मोठं कुतूहल असायचं. त्यामुळेच त्यांनी त्यासाठी संस्कृतचं शिक्षणही घेतलं. जुन्या संस्कृत ग्रंथांतून संगीताचा अभ्यास सिद्ध केला. अनेक गोष्टींचा मागोवा घेतला. शेकडो वर्षांपूर्वी राग खरे कसे गायले जायचे? त्यांचं त्यावेळचं रूप कसं होतं? त्या रागाचं वातावरण कसं होतं? ते वातावरण हुकमीपणे निर्माण कसं करायचं आणि त्याचं तंत्र काय?... अशा अनेक गोष्टींचा ताईंनी सखोल अभ्यास केला होता. मला वाटतं, त्यामुळेच की काय, पण ताईंचं गाणं हे एकीकडे विद्वानांना जेवढं खुणावत असे, तेवढंच ते संगीतातलं फारसं न कळणाऱ्या सर्वसामान्य रसिकालाही धरून ठेवत असे ! ताईंचं गाणं हे ‘इमोशन्स आणि इंटिलिजन्स’ अशा दोहोंना कवेत घेणारं होतं. एकत्र बांधून ठेवणारं होतं.
माझ्यापुरतं म्हणायचं तर, माझ्या एकूण अस्तित्वालाच ताई अंतर्बाह्य व्यापून राहिल्या आहेत. माझ्या प्रत्येक स्वरात त्या आहेत. माझ्या प्रत्येक विचारात त्या आहेत. जीवनाकडे पाहावं कसं, याची दृष्टीच ताईंनी मला दिली. ऐकू न येणाऱ्याला कर्णयंत्रामुळे जे बळ मिळतं आणि दृष्टिहीनाला डोळे मिळाल्यावर जे नवं जगणं मिळतं ना, तसंच काहीसं बळ आणि उमेद ही ताईंच्या गुरुकृपेनं मिळते, हा माझा अनुभव आहे.
ताईंच्या स्वरांत एक गूढता जाणवून यायची. त्यांच्या गाण्यात असा काही उत्कट भाव होता की, तो थेट आपल्या मनातल्या आजवर अस्पर्श असणाऱ्या त्या अंधाऱ्या कोपऱ्याला अलगद स्पर्शून जायचा. म्हणूनच त्यांचं गाणं वेगळं होतं. म्हणूनच त्या आज जाऊनसुद्धा माझ्या आत उरलेल्या आहेत. त्या गेलेल्या नाहीत. किशोरीताई अशा व्यक्ती नव्हत्याच की त्या जातील. त्या गेलेल्याच नाहीत.

संगीताचं ते सूर्याप्रमाणे असणारं लखलखीत तेज नक्की काय आहे, हे ताईंच्या सान्निध्यात आल्यावरच जाणवू शकलं आणि स्वतः ताईतरी कुठे यापेक्षा वेगळ्या होत्या? त्या स्वतःही तर संगीताकाशातल्या एक सूर्य होत्या. आपलं उभं आयुष्य त्या सतत तळपतच राहिल्या आणि तळपत असतानाच गेल्या. त्यांचे स्वर, त्यांची अफाट बुद्धिमत्ता, त्यांचे प्रगल्भ विचार, त्यांची उत्कटता आणि त्यांच्या भावपूर्ण अन हृदयस्पर्शी आवाजाने त्या माझ्या मनात खूप खूप खोलवर आत्ताही आहेत. माणूस खरंच जातो का, हा मला आज पडलेला प्रश्‍न आहे. मी ताईंना क्षणभरही कशी बरं विसरू शकेन ?...
(शब्दांकन : स्वप्नील जोगी)

--------------------------------------------

किशोरीताई...
अरुण काकतकर

१९  ६७-६८ साल असेल बहुधा... माझी ओळख बाळ गडकरीनं श्रीकांत दादरकरशी करून दिली होती. कारण बाळला माझी संगीतविषयक असोशी माहीत होती आणि श्रीकांत
माणिकताईंचा भाऊ, त्यामुळे  माणिकताईंकडील येणं-जाणं सुरू झालं. त्यांच्या अनेक मैफलींना तर मी जायचोच; पण श्रीकांतबरोबर अन्य दिग्गजांच्या मैफलींनासुद्धा मला सहज प्रवेश मिळून जायचा...

अशीच एक सकाळची मैफल मला आठवतेय... एचएमव्ही म्हणजे हरी महादेव वैद्य सभागृह. दादरच्या कोहिनूर मिलच्या मागच्या बाजूला... मैफल होती गानसरस्वती किशोरीताईंची.

श्रोतृवृंदांत त्या काळचे अनेक संगीताचार्य, विश्‍लेषक बसले होते... मला आठवतंय त्याप्रमाणे पंडित जसराजजीसुद्धा होते अगदी समोरच... ताईंनी तोडीनं आरंभ केला होता मैफलीला..

गाता गाता कुठंतरी रागाची चौकट, कदाचित एखाददुसऱ्या श्रुतींनं बिघडल्याची जाणीव त्यांना स्वत:लाच झाली असावी...

तत्क्षणीच डावा तळवा कानाला लावत त्यांनी उपस्थित श्रोतृवर्गाची क्षमा मागितल्याचा आविर्भाव केला...  शास्त्रीय संगीतात परंपरेनुसार आलेल्या रागाच्या स्वरावलींतल्या
आरोहावरोहांत, श्रुतींसह स्वराच्या लगावाच्या मर्यादा पाळण्याच्या बाबतींत किशोरीताईंना मोगूबाईंकडून म्हणजेच आई आणि गुरूंकडून कशी तालीम मिळाली होती, त्याचीच प्रचिती त्या प्रसंगातून मिळाली. ते मला या गानतपस्विनीचं झालेलं पहिलं दर्शन...

कंठसिद्धता वर्षानुवर्षांच्या तपश्‍चर्येनं त्यांनी प्राप्त केलीच होती; पण त्यांच्या कंठांतून अवतरलेला प्रत्येक आलाप, मींड, तान ही किती विचारांती आणि बुद्धिवादी गायकीचा प्रत्यय देणारी. असे ते मीच काय सर्वच रसिकांनी अनुभवलंय... आणि नेमके हेच त्यांच्या गायकीचं वैशिष्ट्य होतं... नंतर काही वर्षांनी, दूरदर्शनच्या लघुपटाच्या निमित्तानं मोगूबाई आणि किशोरीताईंचा इतका जवळून परिचय होणार होता, हे माझ्या स्वप्नांतसुद्धा आलं नव्हतं...

गोव्यात, कुर्डीच्या मोगूबाईंच्या घरी मी, धुमाळ्यांचा विनय, छायालेखक यशवंत कडोलकर आणि ध्वनिमुद्रक (सध्याचा विख्यात गायक) साठ्यांचा रवी... असे सगळे, १९७७च्या एका संध्याकाळी, १२/१५ तासांचा खडतर प्रवास करून चित्रीकरण सामग्री... ११ मि.मि. ब्लिंप्ड्‌ कॅमेरा, ध्वनिमुद्रण संच (अजून नागरा नव्हता आलेला आमच्याकडे तेव्हा...) वगैरेंसह दाखल झालो... आपली मावशी, काकू, आत्या वाटावी इतकी साध्या नऊवारी नेसणीतल्या सौम्य बोलीच्या मोगूबाई आणि त्यांची त्यांची तडफदार, कुशाग्र सुकन्या किशोरी यांनी आमचं स्वागत केलं. चित्रीकरण पुढल्या दिवशी करायचं होतं. त्यामुळं चहा घेताना त्याचं नियोजन, चित्रीकरण स्थळांची निश्‍चिती त्या माय-लेकींच्या सल्ल्यानं आम्ही केली. दिग्दर्शक विनय असल्यानं तो, मी आणि कडोलकर गावात एक फेरफटका मारून आलो. घरी परतल्यावर. परसातल्या विहिरीचं पाणी उपसून आम्ही आंघोळी उरकल्या... नंतर मग तो अवर्णनीय प्रसंग मी अनुभवला...
आमची सर्वांची, ‘जलचरां’ची आवड मोगूबाईंनी आधीच हेरून त्याप्रमाणे तयारी करून ठेवली होती... त्यामुळं रात्रीच्या जेवणात मोगूबाईनी स्वत: रांधलेली घोळाची आमटी, तळलेली पापलेटं, सुरमई तुकडा, कोळंबी मसाला असा दणकून बेत होता...
विनय शाकाहारी... त्यामुळं त्याच्यासाठी केवळ सोलकढी होती... बिचारा... आणि हे सगळं आग्रह करकरून वाढायला कोण होतं माहिताय?पदर खेचून साक्षात (कितीही विशेषण, बिरूदं मागे लावली तरी कमीच पडतील अशा) किशोरीताई...
यापरता आणखी कोणता भोजनसोहळा स्मरणीय असू शकतो का?
दुसरा दिवस, माझा टोपीत आणखी एक तुरा खोचणारा ठरला... सायंकाळी मोगूबाईचं भजन, गावच्या रवळनाथाच्या मंदिरात चित्रित करायचं होतं... सगळी तयारी होती.. फक्त नेहमीचे संवादिनी साथीदार परगावी गेले होते... कोण वाजवणार? मला माझ्या वडिलांनी लहानपणी संगीत शिक्षकांकडून संवादिनीवादनाची दीक्षा दिली होती... त्यामुळं भीत भीतच मी म्हटलं,  

‘‘मी प्रयत्न करू का?’’... ताईंनी माईंच्याकडे एक क्षणभर बघितलं आणि दोघींच्या माना एकसमयावच्छेदे करून होकारार्थी डोलल्या. मग काय? मोगूबाई भजन गाताहेत, किशोरीताई टाळ वाजवतायत आणि मी संवादिनीवर, असं चित्रीकरण पार पडलं...
आदल्या सायंकाळी, गप्पांच्या ओघात किशोरीताईंनी एक अप्रतिम टप्पावजा रचना गायली होती. परतीचा प्रवासाला सुरवात होण्याआधी, मी किशोरीताईंना ती मला मुद्रित करून द्यायची विनंती केली... पूर्ण तीस (जीवघेणे) क्षण त्या माझ्याकडं (बहुधा माझा धारिष्ट्याचे आश्‍चर्य वाटल्यामुळं) पाहत होत्या...


‘‘कशाला हवंय तुला ?’’ ‘‘प्रवासात ऐकायला !’’ ‘‘ठीक आहे, कर! पण मुंबईत पोचताच पुसून टाकायची! काय? आहे कबूल ?’’ ‘‘हो, नक्की!’’

माझा हरखलेला होकार...

प्रवासात ते पाच-सात मिनिटांचं मुद्रण मी अक्षरश: ‘पिसून’ काढलं नि पनवेल आल्यावर रेकॉर्डिंग मोडवर मुद्रक ठेवून, कबूल केल्याप्रमाणं पुसून टाकलं...

जड अंत:करणानं..!

आज सगळा सई मनात तरंगताना पापणीकाठ गहिवरलेत...
माझे शतशः दंडवत....

----------------------------------------------------
संगीताला सौंदर्याचा  नवा आयाम
पद्मजा फेणाणी-जोगळेकर

किशोरीताईंच्या जाण्याने भारतीय संगीताची मोठी हानी झाली आहे. त्यांचे संगीत फारच उच्च कोटीचे होते. त्यांनी जे काम केले आहे ते संगीताच्या क्षेत्रात कायम असणारच आहे.

त्या गेल्या तरी त्यांच्या या संगीताच्या माध्यमातून त्या अजर-अमर राहणारच आहेत. भूप-विभास या रागांमध्ये त्यांचा हातखंडा होता. हे राग म्हटलं की सगळ्यात प्रथम त्यांचीच

आठवण येते. त्यांच्या मैफलीतल्या सादरीकरणाबद्दल तर काय बोलावं, कोणताही राग त्या अशा काही सादर करीत, की साक्षात तो राग मूर्त स्वरूपात आपल्यासमोर उभा असल्याचा

भास व्हावा. त्यांचा रियाज ही एक अनुकरणीय गोष्ट. त्यांची आई आणि गुरू मोगूबाई कुर्डीकर यांनी त्यांच्याकडून अतिशय कठोर रियाज करून घेतला. त्यांनीही आपल्या शिष्यांना ही रियाजाची शिस्त पाळणे भाग पाडले; पण रियाज म्हणजे केवळ घोकंपट्टी नव्हे हेही त्यांनी दाखवून दिले. त्यांनी केवळ रागएके राग मांडला नाही, तर त्यांचे सौंदर्य मांडून, खुलवून दाखविले. स्वतःची अशी शैली निर्माण केली. 

त्यांचे संगीताविषयीचे विचार अतिशय प्रगल्भ होते. त्यांचे हे विचार हे चिंतन यातूनच त्यांनी ‘रससिद्धांत’ला जन्म दिला. त्या गोव्याच्या आणि मी कारवारची; त्यामुळे आम्ही कधी भेटलो की कोकणी भाषेतच संवाद साधायचो. माझ्याबद्दल त्यांच्या मनात जिव्हाळा होता.

------------------------------------

ऋणानुबंध आणि आपुलकी 
अमोल पालेकर (दिग्दर्शक)

किशोरीताईंशी माझी जवळपास तीन दशकांहूनही अधिक काळ मैत्री होती. काही वर्षांपूर्वी मी किशोरीताईंच्या सांगीतिक जीवनावर आधारित ‘भिन्न षड्‌ज’ हा माहितीपट बनवला
होता. त्या निमित्ताने आमच्यातील स्नेहबंध अधिक घट्ट झाले. ‘भिन्न षड्‌ज’ ज्या वेळी मी बनवायला घेतला, त्याआधी मी एकदा त्यांच्याशी फोनवर बोलत असताना त्यांना म्हणालो होतो- ताई, तुमच्याकडे संगीताचा आणि सांगीतिक विचारांचा जो अद्वितीय खजिना आहे, तो तुम्ही आता भरभरून उधळायला सुरवात केली पाहिजे. तो अधिआधिक लोकांपर्यंत पोचला पाहिजे. तो असाच कुठेतरी विरून जाता कामा नये. तेव्हा त्या म्हणाल्या- हे तू करायला पाहिजेस. तू का नाही करत हे?... आणि या संवादानंतर मी ‘भिन्न षड्‌ज’ बनवला.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मी मुंबईहून पुण्याला येत असताना लोणावळ्याला थांबलो होतो. त्याचवेळी तिथे किशोरीताईसुद्धा प्रवासादरम्यान थांबल्या होत्या. मी ताईंना पाहून त्यांना भेटायला गेलो. त्यांना माझी ओळख करून दिली. त्या वेळी त्यांनी त्या मला ओळखत असल्याचं सांगितलं. जरावेळ गप्पा झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं- मोहनराव पालेकर तुझे कोण?- मी त्यांना ‘सख्खे काका’ असं उत्तर दिल्यावर त्यांनी एकदम माझा हात हातांत धरला आणि मला म्हणाल्या- अरे, त्यांच्याकडे मी शिकलेय. मला माईंनी त्यांच्याकडे शिकायला पाठवलं होतं... आमच्या या पहिल्याच भेटीनंतर ताईंना माझ्याबद्दल एक वेगळी आपुलकी तयार झाली. पुढे आमच्यातले ऋणानुबंध, मैत्री वाढत गेली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्‍वाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.

किशोरीताई, विजयाबाई अन्‌ तृप्त रसिक...
दीड पावणेदोन महिन्यापूर्वीची गोष्ट. रसिकांच्या तुडुंब गर्दीपुढील मंचावर एका बाजूला उपस्थित होती अभिजात भारतीय संगीत क्षेत्रातील ‘गानसरस्वती’... तर दुसरीकडे होती नाटक या ललितकलेला आपल्या असामान्य प्रतिभेने स्वतंत्र ओळख मिळवून देणारी रंगभूमीवरील एक विदुषी! गायिका किशोरीताई आमोणकर आणि नाट्यदिग्दर्शक विजयाबाई मेहता या दोघींच्या या एकत्रित दर्शनाने रसिक तृप्त झाले नसते तरच नवल... नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘गानसरस्वती’ महोत्सवात या दोन विदुषींना एकत्र ऐकण्याची अनुभूती रसिकांनी घेतली. या वेळी किशोरीताई म्हणाल्या, ‘‘विजया ही नाट्यक्षेत्रातील सरस्वतीच आहे. तिचं या क्षेत्रातलं काम अतीव मोलाचं आहे. आमच्यात खूप छान मैत्री आहे. त्यात दंभ नाही आणि प्रेमही नाही. आहे ती फक्त माया आहे. विजयाने माझ्याबद्दल बोलावे, याहून मोठा सन्मान तो काय असेल माझ्यासाठी ?...’’


तर, ‘‘आम्ही दोघी केवळ मैत्रिणी नव्हे, तर स्नेही आहोत. स्नेहामध्ये अभिप्रेत असणारी मैत्री आणि आदर असे दोन्हीही आमच्यात आहेत. भावनेपलीकडे जाणारी कलेची दृक्‌श्राव्य प्रतिमा आणि त्यातील सत्याचे लेणे, या गोष्टी मला किशोरीकडून मिळाल्या...’’ अशा शब्दांत विजयाबाईंनी आपल्या भावनांना वाट करून दिली होती.

------------------------------

माझ्या गानगुरू, सद्‌गुरू आणि सर्व काही...
रघुनंदन पणशीकर

किशोरीताईंनी वर्षानुवर्षे गायकीतून रसिकांना स्वरानंद भरपूर दिला आहेच; पण सुरांवर आणि शब्दांवरही प्रेम कसं करायचं, ते आपल्या आचरणातून अनेकांना शिकवलं आहे. स्वरांचा लळा कसा असतो, त्यांच्यावर प्रेम कसं करायचं आणि त्यातून नवनिर्मिती कशी करायची, हे त्यांनीच उत्तमपणे सांगितलं, शिकवलं आणि स्वतःही करून दाखवलं. त्यांची सर्वांत मोठी शिकवण होती, ती समजून घ्या आणि मगच गा ही. गाणं शिकवताना ते आपल्या शिष्याच्या मनापर्यंत पोचतंय, त्याविषयी मनन केलं जातंय ना, याबद्दल त्या अतिशय दक्ष असत. लोप पावत चाललेल्या आलापकारीला त्यांनी पुनर्जीवित केलं. संगीतावरचं त्यांचं चिंतन तर खूपच महत्त्वाचं ठरतं. त्या चिंतनाचा लाभ आम्हाला मिळाला, हे आमचं भाग्यच. 

मला त्यांचा प्रदीर्घ सहवास मिळाला. या सहवासात मी त्यांच्या बऱ्याच गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. किशोरीताईंनी आखून दिलेल्या मार्गावर आम्ही चाललो. शिष्याच्या बाबतीत त्या खूप कठोर होत्या. इतर वेळी समोरच्या व्यक्तीनुसार त्यांचा प्रतिसाद ठरे. समोरचा माणूस ज्याप्रमाणे असेल, त्याप्रमाणेच त्या त्याच्यासोबत वागायच्या. शिष्यांनी गाण्याच्या बाबतीत अजिबात टंगळमंगळ केलेली त्यांना चालत नसे. त्यांनी ठरलेल्या वेळात आलं पाहिजे, शिकवलेली गोष्ट अतिशय पक्की केली पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष असे.

स्वरांकडे दुर्लक्ष झालेले त्यांना अजिबात खपायचे नाही. असं कधी झालंच तर खैर नसे. त्यांचं ओरडणंही मनस्वी असे. त्यांची दोन वाक्‍यं ऐकली तरी डोळ्यांतून पाणी यायचं; पण त्यांच्यासाठी संगीत ही साधना, भक्ती, विचार व तत्त्वज्ञान होते. दर क्षणाला नवनिर्मिती करण्याकडे त्यांचा कल असायचा. प्रत्येक वेळी रागाची शैली वेगळी असायची. 

त्यांना मी आई म्हणून बघतो. त्यांनीही माझ्यावर अलोट प्रेम केलं. मला गाणं यायला हवं, उत्तम यायला हवं, या दृष्टीने त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे आज मी संगीत क्षेत्रात जे काही काम करतो आहे, ते सारेच्या सारे त्यांचेच आहे. त्या माझ्या गानगुरू आहेत आणि सद्‌गुरूही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com