राज ठाकरे अडकलेले 'कोहिनूर' प्रकरण नक्की आहे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांना ईडीची नोटीस आली असल्याने हे राजकीय षड्यंत्र असल्याची चर्चा आहे. राज यांना नेमकी आत्ताच का नोटीस पाठविण्यात आली? आणि या कोहिनूर प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे?​

सध्या राज्यभरात चर्चा आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, मनसे कार्यकर्ते आणि ईडी हे तिनच शब्द सर्वांच्या तोंडी आणि कानीही आहेत. ईडीने नोटीस पाठविल्यापासून राज्यभरातील सर्व माध्यमांवरही सध्या हाच विषय पाहायला मिळतो आहे.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने का नोटीस पाठविली? काय आहे हे कोहिनूर प्रकरण? आणि ते आत्ताच का चर्चेत आले आहे? याचा घेतलेला आढावा. 

अंमलबजावणी संचलनालय (ईडी) विभागाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी चौकशीची नोटीस पाठविली. येत्या 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश राज यांना देण्यात आले. नोटीस आल्यानंतर अशा नोटीशींना भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी बंद पुकारला. 22 ऑगस्टला जे काही होईल, त्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा धमकीवजा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज यांना ईडीची नोटीस आली असल्याने हे राजकीय षड्यंत्र असल्याची चर्चा आहे. राज यांना नेमकी आत्ताच का नोटीस पाठविण्यात आली? आणि या कोहिनूर मिल प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे?

काय आहे हे कोहिनूर प्रकरण?
कोहिनूर स्क्वेअर टॉवर दादरमध्ये ज्या 4 एकर जागेवर उभा आहे, एकेकाळी त्या जागी कोहिनूर मिल क्रमांक 3 उभी होती. ही मिल बंद पडल्यानंतर तिचा ताबा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनने घेतला. त्यानंतर कॉर्पोरेशनने या जागेचा 2005 साली लिलाव केला. या लिलावात शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या मालकीच्या कोहिनूर सीटीएनएल (जी सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अॅण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस (IL & FS) या संस्थेची सहायक कंपनी आहे.) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राजन शिरोडकर यांच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे विकत घेतली. या जागेसाठी या संयुक्त कंपन्यांनी 421 कोटींची बोली लावली होती. 

उन्मेश जोशी यांच्यासोबत IL & FS ने कोहिनूर मिलची जागा खरेदी करण्यासाठी 860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आणि पुन्हा त्यातील काही गुंतवणूक काढून घेतली. तसेच त्यांनी कंपनीतील शेअर्सही विकले. यामध्ये IL & FS कंपनीचे नुकसान झाल्याचा संशय ईडीला आहे. 

IL & FSने आपले शेअर्स विकल्यानंतर राज ठाकरेंच्या मातोश्री इन्फ्रास्ट्रक्टर कंपनीनेही 2008 मध्ये आपले शेअर्स विकले. त्यानंतर IL & FS पुन्हा या प्रकल्पात गुंतवणूक केली. 2005 मध्ये कोहिनूर मिलचा व्यवहार झाला, तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते. पुढच्या वर्षी म्हणजे 2006 साली त्यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. राज यांची गुंतवणूक, शेअर्सची विक्री आणि IL & FS ने पुन्हा केलेली गुंतवणूक हा सर्व 'कोहिनूर' प्रकार ईडीच्या तपासाचा रोख आहे. 

दुसरीकडे उन्मेष जोशी यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून कर्ज घेतल्याने त्यांच्यावर कर्ज झाले होते. त्यामुळे त्यांनी त्याकाळच्या रिअल इस्टेटमधील अत्यंत मोठ्या अशा 2100 कोटींच्या कोहिनूर प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. उन्मेष जोशी यांच्यावर जवळपास 900 कोटी रुपायंचे थकित कर्ज झाले होते. विविध कंपन्यांचे कर्ज फेडण्यात कोहिनूर ग्रुपला अपयश आल्याने त्यांनी जून 2017 मध्ये नॅशनल लॉ ट्रायब्युनलकडे धाव घेतली. त्यानंतर ट्रिब्युनलने प्रभादेवीमधील संदीप शिक्रे अॅण्ड असोसिएट्स या कंपनीला हा प्रोजेक्ट देण्याची शिफारस स्वीकारल्याने उन्मेष जोशी यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला.

गेले दोन-अडीच वर्ष हा प्रकल्प बंद पडला होता. 26 जानेवारीपासून या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू झाले असून पुढील 15 ते 18 महिन्यात त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

राज यांना ईडीची नोटीस का?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोहिनूर प्रोजेक्टमधून का बाहेर पडले? याबाबत ईडी चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. IL & FS कंपनीने 225 कोटी रुपयांची थेट गुंतवणूक केल्यानंतर 2008 मध्ये आपल्या मालकीचे सर्व शेअर्स फक्त 90 कोटींना विकले. त्याचवेळी राज यांनीही आपल्या मालकीचे सर्व शेअर्स विकून या प्रोजेक्टमधून बाहेर उडी घेतली होती. 

कोहिनूर स्क्वेअरविषयी...
- दादरमध्ये शिवसेना भवनासमोरील 52 आणि 25 मजल्यांचे दोन जुळे टॉवर असलेला हा कोहिनूर प्रकल्प. 

- यात मुख्य इमारतीच्या पहिल्या पाच मजल्यांवर अत्याधुनिक शॉपिंग मॉल्स

- 15 मजल्यांवर 2 हजार गाड्यांचे पार्किग होईल एवढे भव्य पार्किंग

- 47 मजल्यांवर आलिशान सदनिका आणि सिंगापूर ब्रँडचे 'द आयू मुंबई' हे पंचतारांकित हॉटेल

- संपूर्ण प्रकल्पाची किंमत आहे 2100 कोटी रुपये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know about Raj Thackerays connection with Kohinoor case