कोल्हापूर, नाशिक, अमरावतीला टेकऑफची प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारने हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी विमानतळांची निर्मिती आणि ‘उडान’सारख्या योजना हाती घेऊन एक पाऊल पुढे टाकत विमान सेवेला देशात ‘अच्छे दिन’ असल्याचे स्वप्न दाखवले; मात्र कोल्हापूर, कराड, नाशिक, अमरावती इत्यादी ठिकाणच्या विमानतळांच्या समस्या व नियमित विमानसेवांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. राज्यात उर्वरित ठिकाणांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.    

कोल्हापूर - केंद्र आणि राज्य सरकारने हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी विमानतळांची निर्मिती आणि ‘उडान’सारख्या योजना हाती घेऊन एक पाऊल पुढे टाकत विमान सेवेला देशात ‘अच्छे दिन’ असल्याचे स्वप्न दाखवले; मात्र कोल्हापूर, कराड, नाशिक, अमरावती इत्यादी ठिकाणच्या विमानतळांच्या समस्या व नियमित विमानसेवांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. राज्यात उर्वरित ठिकाणांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.    

कोल्हापूरची विमान सेवा बंद होऊन सहा वर्षे उलटली तरी ही सेवा पुन्हा सुरू करण्यात यश आलेले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आता विमान सेवा ‘अंबाबाईच बघून घेईल’, असे भाष्य करून जाहीरपणेही अगतिकता व्यक्त केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचेही यासाठी दिल्ली दरबारी सातत्याने प्रयत्न चालू आहेत; तरीही विमानसेवा केव्हा सुरू होईल, याबाबत तेही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. यापूर्वी अनेक तारखा, मुहूर्त वाया गेले आहेत. विमानतळाच्या नूतनीकरणाच्या हालचालींना वेग येत आहे; मात्र विमानसेवा केव्हा सुरू होईल हे कोणीही सांगत नाही. धावपट्टीच्या प्रश्‍नाच्या अनुषंगाने विमानतळाचा परवाना रद्द करण्यात आला. तो अद्याप मिळालेला नाही. कोल्हापुरातील विमानसेवा सुरू झाल्यास दक्षिण महाराष्ट्र तसेच सीमाभागातील परिसरात उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. पर्यायाने पर्यटनही वाढेल. तथापि व्यापक प्रयत्न असूनही सेवा सुरू होत नाही. 

कऱ्हाडला निधीची प्रतीक्षा  
कऱ्हाड - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मुद्दा हाती घेतला. या प्रकल्पात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. त्या दरम्यान भूमी अभिलेख विभागाच्या वतीने विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणीही करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राजकीय उलथापालथ होऊन विधानसभा निवडणुका लागल्या. सत्ता बदल झाल्यानंतर विमानतळ विस्तारीकरणासाठी अपेक्षित निधी मिळाला नाही. विमानतळासाठीची प्रशासकीय पातळीवरील कार्यवाही पूर्ण झाली आहे; मात्र निधीच्या कमतरतेमुळे अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकचा अनुभव निराशाजनक
नाशिक - हवाई सेवेबाबतचा नाशिककरांचा अनुभव निराशाजनक आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आर्टिलरी सेंटरचे विमानतळ आहे. तेथून यापूर्वी हवाई सेवा सुरू होती; परंतु कालांतराने ती बंद पडली. त्यानंतर सेवा अद्याप सुरूच झालेली नाही. नाशिकपासून वीस किलोमीटरवर ओझर येथे ‘एचएएल’ हा लढाऊ विमाने तयार करण्याचा कारखाना आहे. त्या विमानतळाची धावपट्टी आशिया खंडात सर्वांत मोठी म्हणजे सव्वातीन किलोमीटर आहे. असे असताना येथूनदेखील हवाई सेवा सुरू होऊ शकलेली नाही. ओझर विमानतळावर राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या निधीतून ६५ कोटी रुपये खर्च करून एअर टर्मिनलची उभारणी करण्यात आली आहे. ‘एचएएल’कडे एक रुपया एवढ्या नाममात्र दरात टर्मिनलचे हस्तांतरणदेखील झाले; परंतु चार वर्षे झाली तरी त्याचा वापर होत नाही.

अमरावतीच्या उड्डाणाला ब्रेक
अमरावती - विभागीय मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या अमरावतीत अद्यापही विमानसेवा सुरू झालेली नाही. भाजपचे सरकार आल्यावर आतापर्यंत अनेकदा घोषणा झाल्या; परंतु अद्याप उड्डाणाचा मुहूर्त सापडलेला नाही. अमरावतीला लागूनच असलेल्या बडनेरा उपनगराजवळ बेलोरा येथे विमानतळ आहे. बेलोरा विमानतळावरून सध्या सहाआसनी चार्टर्ड विमानाचे उड्डाण होते. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण विभागाने बेलोरा विमानतळ विकसित करण्यासाठी नकार दिल्याने, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) नियुक्त करण्यात आले; परंतु सध्या हा चेंडू सरकारच्या कोर्टात आहे. त्यांनी निर्णय घेतल्यासच ‘एमएडीसी’कडून या कामाला सुरवात होईल. जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विमानतळ विकसित करण्यासाठी जुनी धावपट्टी विस्तारित केली जाऊन एक हजार ८५२ मीटर इतकी ती करण्यात आली. त्यामुळे येथील विमानतळावरून आता सहाऐवजी ७२ आसनी विमानाचे टेकऑफ होईल. त्यासाठी ७५ कोटींचा निधीही मंजूर झाला; मात्र सामान्य प्रशासन विभागाकडून हिरवा झेंडा मिळाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होऊ शकेल.

सामाजिक, आर्थिक विकासात योगदान 
आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक दिन दरवर्षी ७ डिसेंबरला साजरा होतो. सामाजिक, आर्थिक विकासात नागरी हवाई वाहतुकीचे योगदान अधोरेखित करण्याचा त्यामागे उद्देश आहे. तसेच या क्षेत्रातील सुरक्षा, दक्षता आणि नियमितता याकडे लक्ष वेधणे आणि त्याला जागरूक प्रयत्नांची जोड देणे असाही उद्देश आहे. १९४४ मध्ये अमेरिकेत शिकागो येथे ७ डिसेंबर, याच दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संघटनेची स्थापना झाली. या संघटनेच्या ५० व्या वर्धापनदिनी १९९४ मध्ये सर्वप्रथम हवाई वाहतूक दिन साजरा केला गेला. त्यानंतर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक दिन म्हणून जाहीर केला.

Web Title: Kolhapur News Airport issue in Kolhapur, Nashik, Amaravati