पोरक्‍या मुलांना हक्काबरोबरच मिळाले प्रेम 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - अपघातात आई गेली आणि दोन मुले आईविना पोरकी झाली. वडिलांकडून त्यांना आईची माया मिळाली नाही. तीन-चारशे किलोमीटरवरून न सांगता ती मुले पळून आली. विधी सेवा प्राधिकरणाने त्या मुलांना आधार दिला. आसरा, शिक्षण, न्याय हक्कच नव्हे, तर वडिलांचे प्रेमही मिळवून दिले. 

कोल्हापूर - अपघातात आई गेली आणि दोन मुले आईविना पोरकी झाली. वडिलांकडून त्यांना आईची माया मिळाली नाही. तीन-चारशे किलोमीटरवरून न सांगता ती मुले पळून आली. विधी सेवा प्राधिकरणाने त्या मुलांना आधार दिला. आसरा, शिक्षण, न्याय हक्कच नव्हे, तर वडिलांचे प्रेमही मिळवून दिले. 

शासकीय सेवेत छाया विजय कोदे या कर्तव्य बजावत होत्या. त्यांचे पती ठाण्याला राहतात. नोकरीबरोबर त्या मुलगी निशा (वय 17) व निरज (वय 15) यांना सांभाळत होत्या. मध्यवर्ती बस स्थानकात भावाला सोडण्यासाठी गेलेल्या या महिलेचा दाभोळकर चौकात अपघात झाला. एका भरधाव मोटारीने त्यांना उडवले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची दोन्ही मुले आईविना पोरकी झाली. अंत्यसंस्कारानंतर वडील दोन्ही मुलांना ठाण्याला घेऊन गेले. मात्र, त्यांना आईचे प्रेम, माया तेथे मिळत नव्हती. त्यामुळे निशा व निरज हे दोघे रात्रीच कोणालाही न सांगता थेट कोल्हापूरला पळून आले. त्यांची भेट आईची मैत्रीण शिवणकर यांच्याशी झाली. त्यांनी त्या दोघांना आधार दिला. त्यानंतर त्या दोघांना घेऊन त्या थेट विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे सचिव, न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांच्याकडे आल्या. त्यांनी त्यांची विचारपूस केली. त्यांना मानसिक आधार दिला. पुढील संगोपनासाठी त्या दोघांना अवनि संस्थेत पाठवले. त्या दोन्ही मुलांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे चेअरमन आर. जी. अवचट यांच्याशी चर्चा करून त्यांनी तातडीने ऍड. पल्लवी थोरात यांची नेमणूक केली. 

शिक्षण हक्क कायद्यानुसार निशाला विवेकानंद महाविद्यालयात तर निरजला लक्ष्मीपुरीतील हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन दिला. त्यांना रिक्षाने सोडणे व आणण्याची सोयही केली. यानंतर जिल्हा न्यायाधीश एल. डी. बिले, ए. एम. शेटे यांच्या न्यायालयात विधी सेवा प्राधिकरण तर्फे गार्डियनशिप ऍक्‍ट अन्वये याचिका दाखल केली. विधी सेवा प्राधिकरणाने अवघ्या 24 तासांत दोन्ही मुलांना मोफत वकील मिळवून दिला. त्याआधारे आईची ग्रॅच्युइटी, निवृत्तीवेतन, प्रॉव्हिडंड फंड यामध्ये समान हक्क मिळवून दिला. त्यांच्या नावावर राष्ट्रीयीकृत बॅंकेत रक्कम ठेवण्याचा आदेशही मिळाला. दोन्ही पैकी एकजण सज्ञान झाल्यावर आईच्या ठिकाणी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांनाही आपली चूक समजली. मुलांना त्यांचे बाबा पुन्हा मिळाले. विधी प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे, ऍड. पल्लवी थोरात आणि अवनिच्या सुनीता भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले.

Web Title: kolhapur news Law Service Authority