एसपी साहेब, चौकीत तरी पोलिस नेमा! 

राजेश मोरे
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर - गुंडगिरी, चेन स्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी चौकाचौकांत राहू दे, एसपी साहेब, शहरातील पोलिस चौकीत निदान एक-दोन पोलिस नेमा... अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

कोल्हापूर - गुंडगिरी, चेन स्नॅचिंगचे प्रकार रोखण्यासाठी चौकाचौकांत राहू दे, एसपी साहेब, शहरातील पोलिस चौकीत निदान एक-दोन पोलिस नेमा... अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

लोकसंख्या वाढीबरोबर शहराचाही झपाट्याने विस्तार होत गेला. तशी शहराच्या चारही बाजूंनी उपनगरांची संख्या वाढत गेली. शहरातील चारही पोलिस ठाणी व उपनगरांतील अंतरही दिवसेंदिवस वाढत आहे. आज एक वाहन दुसऱ्या वाहनाला धडकले तरी त्यातून होणारा वाद हाणामारीपर्यंत पोचतो. शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरातही टवाळखोरांची संख्या काही कमी नाही. त्यांच्यातही वारंवार खटके उडतात. उपनगरातील निर्जनस्थळाचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढू लागले आहेत. त्याचा धसका महिला वर्गाने घेतला आहे. बंद घरातच नव्हे तर घरात वृद्ध माणसे असतानाही चोरटे हात साफ करून जात आहेत. गेल्या दोन महिन्यांत शहर परिसरात ४० घरफोड्यांचे प्रकार घडले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कालच घरफोड्या करणारी चड्डी बनियन गॅंग पकडली. टोळीने आम्ही टेहळणी करून घरफोड्या केल्याची कबुली दिली. वर्दीतील पोलिसाच्या अस्तित्वामुळे मारामाऱ्या, चेन स्नॅचिंग, चोऱ्यांवर लगाम घालता येऊ शकतो. याच हेतूने पोलिस चौकीची संकल्पना पुढे आली. शहरात गरजेनुसार पोलिस चौकी स्थापन केल्या. सध्या मार्केट यार्ड, ताराराणी चौकी, शाहू मिल, आर. के. नगर, सुभाषनगर, शुक्रवार पेठ, बाजार गेट, शिवाजी पेठ, वाशीनाका, साळोखेनगर, कळंबा पोलिस चौकी आहेत. त्यातील आर. के. नगर, मार्केट यार्ड, ताराराणी चौकी, सुभाषनगर, कळंबा या पोलिस चौकीचा अपवाद वगळता इतर पोलिस चौक्‍यांची अवस्थी म्हणजे सदा बंद अशीच आहे. दैनंदिन कामाच्या नावाखाली पोलिसांचा अधिक वावर हा ठाण्यातच असतो. नवा अधिकारी आला की जोमाने पुन्हा पोलिस चौक्‍या सुरू होतात. कालांतराने त्या कधी बंद पडल्या हे समजतही नाही.

साळोखेनगर येथील पोलिस चौकीसाठी येथील संस्थेने जागा दिली, मात्र ही चौकी फक्त गणपती व नवरात्र उत्सवाच्या बंदोबस्तासाठी आलेले पोलिसच उघडतात. एरवी ती बंद असते. पोलिसांचे अस्तित्वच शहरातील मुख्य चौकात, संवेदनशील भागात अगर उपनगरात दिसत नसल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर चौकाचौकांत पोलिसांचे अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागे पडला. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्याबरोबर सुरक्षितता देण्यासाठी पोलिस अधीक्षक मोहिते साहेबांनी निदान शहरातील पोलिस चौक्‍या सुरू कराव्यात. तेथे निदान नव्याने भरती झालेले निदान दोन पोलिस कर्मचारी तरी द्यावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

नागरिकांच्या अपेक्षा
- शहरातील सर्व पोलिस चौक्‍या सुरू करा
- चौकीत निदान दोन पोलिसांची नियुक्ती करा 
- चौकीत तक्रारीची दखल घ्या 
- नागरिकांच्या मदतीने गुन्हे वेळीच रोखा

उपनगरात चोऱ्या मारामाऱ्यांचे प्रकार सातत्याने घडतात. पोलिसांच्या अस्तित्वाने अशा गुन्ह्यांना वेळीच लगाम घातला येतो. त्यासाठी शहरातील सर्वच पोलिस चौक्‍या प्रशासनाने तातडीने सुरू कराव्यात. 
डॉ. अजित राजिगरे, नागरिक, शिवप्रभूनगर. 

एखादी तक्रार अगर संशयित व्यक्तीबाबतची माहिती देण्यासाठी उपनगरातील लोकांना पाच ते सहा किलोमीटरवरील पोलिस ठाण्यात जावे लागते. याचा विचार प्रशासनाने करून पोलिस चौक्‍या सुरू कराव्यात. 
- अभय तेंडुलकर, नागरिक, साळोखेनगर.

Web Title: kolhapur news police station police

टॅग्स