प्रताप चव्हाणांची हकालपट्टी करा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

कोल्हापूर - जिल्हा बॅंकेचा खोटा ताळेबंद करणाऱ्या, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकारी संचालक प्रताप चव्हाण यांची बॅंकेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी जिल्हा बॅंकेवर मोर्चा काढला. बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ हेही जसे बोलतात तसे वागत नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी या वेळी केला. 

कोल्हापूर - जिल्हा बॅंकेचा खोटा ताळेबंद करणाऱ्या, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकारी संचालक प्रताप चव्हाण यांची बॅंकेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करत कर्मचाऱ्यांनी जिल्हा बॅंकेवर मोर्चा काढला. बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ हेही जसे बोलतात तसे वागत नसल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी या वेळी केला. 

दरम्यान, १५ दिवसांत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, अनुकंपावरील भरती करावी व प्रताप चव्हाण यांना हटविले नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट बॅंक एम्प्लॉईज युनियन व जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांनी आज दिला.  बॅंक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे म्हणाले, ‘‘प्रताप चव्हाण यांना दीड लाख रुपये पगार दिला जातो. ते बॅंकेचा खोटा ताळेबंद तयार करतात; पण जे कर्मचारी अडीच हजार रुपये घेतात त्या कर्मचाऱ्यांबाबत चुकीची भूमिका घेत आहेत. बॅंकेसाठी ३७० कोटी रुपये वसूल करणारे कर्मचारी दहा ते पंधरा वर्षांपासून केवळ २५०० रुपये पगारावर काम करत आहेत. बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी याबाबत विचार केला पाहिजे; पण संचालक मंडळाची दिशाभूल करणाऱ्या कार्यकारी संचालकाला कंपाऊंडबाहेर फेकून दिले पाहिजे. चव्हाणसारख्या अधिकाऱ्याला कोणत्याही बॅंकेने नांदवले नाही म्हणून आपल्या बॅंकेत ठेवून घेतले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना १५ हजार ते १८ हजार रुपये पगार हवा होता त्यांना अडीच हजार रुपयांमध्ये काम करावे लागत आहे. चव्हाण यांना नेहमीच बॅंक तोट्यात राहावी आणि आपणच या बॅंकेवर प्रशासक म्हणून राहावे असे वाटत होते. अशा अधिकाऱ्याला हाकलून लावले पाहिजे.’’

कोल्हापूर डिस्ट्रिक्‍ट बॅंक एम्प्लॉईजचे अध्यक्ष भगवान पाटील म्हणाले, ‘‘बॅंक कर्मचारी सहनशील आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा अन्याय सहन केला. भविष्यात ते अन्याय सहन करणार नाहीत. प्रताप चव्हाण यांना फुकट पोसण्याचे काम केले जात आहे. बॅंकेच्या गेस्ट हाऊसमध्ये डबे आणून देणाऱ्यांनाही धडा शिकवला पाहिजे. असे डबे आणून देणाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. ज्यांना कामाचा गंध नाही, ते मोठ्या पदावर काम करत आहेत. ज्या चव्हाणांना राज्यातील इतर बॅंकांनी नाकारले त्यांना केडीसीसीत स्थान दिले आहे. जे नियोजन किंवा काम संचालक मंडळ करत आहे, ते प्रशासक असताना का झाले नाही?’’

बॅंकेचे संचालक बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘कर्मचाऱ्यांना न्याय दिला जाईल. कार्यकारी संचालकपदासाठी योग्य अधिकारी मिळत नाही. आपल्या येथे पद घेऊन दुसऱ्या बॅंकेत चांगल्या पदावर काम करायला जातात. बॅंकेत सध्या नाबार्डची तपासणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल.’’

यावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रताप चव्हाण यांच्यामुळे १२ अधिकारी नोकरी सोडून दुसऱ्या बॅंकेत गेले. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी पाटील यांच्याकडे केली. यावेळी बाळासाहेब पाटील यांच्यासह विलास गाताडे व असिफ फरास यांनी निवेदन स्वीकारले. 

अध्यक्ष नसले तरीही फरक पडत नाही... 
जिल्हा बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ आले नाहीत. उपस्थित कर्मचाऱ्यांनी, ‘अध्यक्ष येऊ देत किंवा नको. ते असले काय आणि नसले काय आम्हाला फरक पडत नाही,’ असा टोला लगावला. 

चव्हाण हटवा मागणीच केंद्रस्थानी
प्रताप चव्हाण कर्मचाऱ्यांची पिळवणूक करतात, चुकीच्या माणसांना पदोन्नती देतात, ज्यांची क्षमता नाही, अशा मर्जीतील माणसांना हाताशी धरून बॅंकेत लावालावीचे काम करतात. त्यामुळे बॅंकेचे हित धोक्‍यात आले असून चव्हाण यांची बॅंकेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी करून जोरदार घोषणा मोर्चात दिल्या जात होत्या. 

प्रमुख मागण्या 
- कार्यकारी संचालक प्रताप चव्हाण यांना हटवा
- रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करा
- अनुकंपातील नोकर भरती करा
- रविवारी सुटीच्या दिवशी कामावर बोलवू नका
- कर्मचाऱ्यांना १०.८५ कोटी फरकाची रक्कम त्वरित द्या
- निवृत्त कर्मचाऱ्यांची लिव्ह सॅलरी त्वरित द्या
- २७ शाखांमध्ये दोनच कर्मचारी आहेत ते वाढवा 
- महिला कर्मचाऱ्यांना ऑफिस वेळेनंतर थांबवून घेऊ नये

वर्षानंतरही निर्णय नाही
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी वर्षापूर्वी सहा महिन्यांत प्रताप चव्हाण यांच्याबाबत विचार करण्याची ग्वाही दिली होती; मात्र एक वर्ष होऊनही त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आणि चव्हाण यांना कामावरून कमी करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ हे जसे बोलतात तसे वागत नसल्याचेही भगवान पाटील यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news pratap chavan kolhapur district bank