सरकारमधून बाहेर पडण्याचे शेट्टींचे संकेत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक तातडीने बोलवण्यात येणार असून या बैठकीत सरकारमध्ये रहायचे की याचा निर्णय घेणार असल्याचे सांगत संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे सूतोवाच केले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. 

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक तातडीने बोलवण्यात येणार असून या बैठकीत सरकारमध्ये रहायचे की याचा निर्णय घेणार असल्याचे सांगत संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचे सूतोवाच केले. शासकीय विश्रामगृहावर त्यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधला. 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला स्वाभिमानीने पाठिंबा दिला होता. याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले,"शेतकऱ्यांचे प्रश्‍न सुटावेत यासाठी सरकारला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे आश्‍वासन दिले होते. पण राज्यातील भाजपा सरकारवर सहयोगी असलेला आमचा पक्ष नाराज आहे. त्यामुळे सरकारसोबत राहावे का नाही याचा विचार करावा लागेल. याचा निर्णय घेण्यासाठी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक तातडीने बोलवण्यात येणार आहे. या बैठकीतच सरकारसोबत रहायचे का नाही याचा निर्णय घेतला जाईल.' 

संपाबाबत बोलताना ते म्हणाले,"सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर दिसत नाही. शेतकरी प्रश्‍नावर आज पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. सरकारने याची दखल घ्यावी. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही यावर आम्ही ठाम आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बंदची माहिती घेतली असता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शांततेत लोकशाही मार्गाने हा संप झाला. ज्या उद्देशाने संप पुकारला तो उद्देश सफल झाला.' 

ते म्हणाले,"आजचा बंद उत्स्फुर्तपणे पाळून समाजातील इतर घटकांनीही शेतकरी एकटा नाही हे दाखवून दिला. इचलकरंजीत रिक्षाचालकांनी मोर्चा काढून निवेदन दिले. कोल्हापूर शहरात वकिलांची संघटना असलेल्या बार असोशिएनने कामकाजावर बहिष्कार टाकून संपाला पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर या वकिलांनी शेतकऱ्यांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यात मोफत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे या लढ्याला अधिक बळ मिळाले आहे. आमची लढाई ही एकाकी नसून त्याला समाजाचा पाठिंबा आहे, त्यातून आम्हाला आधार मिळाला आहे. राज्य सरकारला एकप्रकारे इशारा मिळाला आहे. शेतकऱ्यांना एकटे पाडाल तर हा समाज स्वस्थ बसणार नाही हा संदेश यातून दिला आहे.' 

Web Title: kolhapur news raju shetty